भारताच्या दुसऱ्या चंद्र मोहिमेची उलटगणती सुरू झाली असून यावेळी चंद्राभोवती फिरण्याऐवजी थेट चंद्रावर उतरण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. श्रीहरीकोटा येथून चंद्रयान १५ जुलै पहाटे २.५१ वाजता उड्डाण करणार असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवण्याचं इस्रो शास्त्रज्ञांचं ध्येय आहे. सर्वकाही नियोजनानुसार पार पडल्यास अंदाजे ६ सप्टेंबर रोजी लँडर चंद्रावर उतरेल! मोहीम यशस्वी झाल्यास भारत चंद्रावर उतरणारा जगातला चौथा देश ठरणार आहे!
अपडेट : काही तांत्रिक कारणांमुळे इस्रोने ही मोहीम तात्पुरती रद्द केली असून उड्डाणाची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
उड्डाणाची प्रक्रिया
श्रीहरीकोटा येथील श्री. सतीश धवन स्पेस सेंटर येथून हे यान प्रक्षेपित केलं जाईल. यासाठी वापरलं जाणारं लाँचर रॉकेट GSLV Mk III किंवा बाहुबली या नावाने ओळखलं जाणार आहे. याद्वारे ऑरबिटर, लँडर, रोव्हर यांना एकत्र प्रक्षेपित केलं जाईल. चांद्रयान २ द्वारे १.४ टन वजनाचा विक्रम नावाचा लँडर जोडलेला आहे. ज्याच्यामध्ये २७ किलो वजनाचा प्रज्ञान रोव्हर आहे. लँडर चंद्रावर उतरेल आणि मग त्यातून रोव्हर बाहेर पडेल. रोव्हर ही एक छोटीशी गाडी असते जी चंद्रावर प्रत्यक्षात प्रवास करेल. यावर सोलार पॅनल्स बसवलेले असतात जे याच्यासाठी विद्युत ऊर्जा पुरवठा करतील. इतर विस्तृत माहिती youtu.be/eJcr_j8T99k?t=66 येथे पाहता येईल.
चांद्रयान २ मोहिमेचा उद्देश
चांद्रयान २ दक्षिण ध्रुवावर जगातलं पहिलंच लॅंडींग असणार आहे. या भागावर उतरता येऊ शकतं हे पाहणं इस्रोचा या मोहिमेद्वारे प्रमुख उद्देश असेल. दूसरा उद्देश चंद्रावर कमी तपासल्या गेलेल्या जागी नेहमी पाणी सापडू शकेल या दृष्टीने तपासणी करणे हा असेल. खनिज व रासायनिक गोष्टी यांची उपलब्धता, चंद्राचं वातावरण यांचाही अभ्यास यावेळी केला जाईल. या मोहिमेचा खर्च ६०३ कोटी असून (रॉकेट वगळता) नासापेक्षा २० पट कमी खर्चात भारत ही मोहीम पार पाडणार आहे!
या मोहिमेची लाईव्ह स्ट्रिम १५ जुलैच्या पहाटे २.५१ म्हणजे उड्डाणाच्या आधी अर्धा तास उपलब्ध होईल. यासाठी तुम्ही इस्रोच्या खालील लिंक्सवर जाऊन लाईव्ह स्ट्रिमद्वारे चांद्रयानाची झेप (१५ जुलै पहाटे २.३० वाजल्यापासून) लाईव्ह पाहू शकाल!
- twitter.com/isro (Chandrayaan 2 Live Updates)
- facebook.com/isro (Chandrayaan 2 Live Stream)
- youtube.com/user/DoordarshanNational
- www.isro.gov.in/
- डीडी दूरदर्शन टीव्ही वाहिनीवर सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण (१५ जुलै पहाटे २.३० वाजल्यापासून)