गेल्या काही महिन्यात फास्ट चार्जिंगच्या बाबतीत बरेच वेगवान पर्याय उपलब्ध होत असून क्वालकॉमचं Quick Charge, वनप्लसचं Warp Charge, ओप्पोचं VOOC Charge, हुवावेचं Super Charge, इ. तंत्रज्ञानामध्ये सर्वात वेगवान चार्जिंग देण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. काही महिन्यांपूर्वीच शायोमीने 100W फास्ट चार्जींग तंत्रज्ञान दाखवलं होतं जे १७ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करू शकेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता विवोने त्यापुढे जाऊन तब्बल 120W ने चार्ज करणारं सुपर फ्लॅश चार्ज तंत्रज्ञान सादर केलं आहे!
हे नवं तंत्रज्ञान 4000mAh बॅटरी केवळ १३ मिनिटात पूर्ण चार्ज करू शकेल असा दावा विवोने केला असून याबद्दल डेमो देणारा व्हिडीओ चिनी वेबसाइट वेबो (Weibo)वर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका फोनला १६ सेकंद चार्ज करताना दाखवण्यात आलं असून या वेळेत तो फोन १० ते १४% टक्के चार्ज झाल्याचं पाहायला मिळतं. पूर्ण चार्ज झालेला फोन मात्र या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेला नाही.
विवोचं आत्तापर्यंतच सर्वात फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान 44W वापरायचं आणि हे iQOO गेमिंग फोनमध्ये पाहायला मिळालं होतं. यानंतर त्यांनी आता थेट 120W वर झेप घेतली आहे! सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या फोन्सबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये Oppo Find X Lamborghini Edition हा सर्वात वेगाने चार्ज होणारा फोन असून हा 3400mAh ची बॅटरी SuperVOOC चार्जरद्वारे ३५ मिनिटात पूर्ण चार्ज करतो!
विवोचं सुपरफ्लॅश चार्ज 120W चार्जिंग असलेला फोन पुढील आठवड्यात भरणाऱ्या MWC शांघायमध्ये त्यांच्या पहिल्या 5G फोनसोबत पाहायला मिळेल अशी शक्यता आहे.