एचपीने काल एक ड्युअल स्क्रीन लॅपटॉप सादर केला असून यामध्ये मुख्य डिस्प्लेसोबत लॅपटॉपच्या किबोर्डवरही एक छोटा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा दुसरा डिस्प्ले ६ इंची 1080p रेजोल्यूशन असलेला आहे. या डिस्प्लेला मुख्य डिस्प्लेवरील दृश्य मिरर करून छोट्या डिस्प्लेवर दाखवण्याची भन्नाट सोय देण्यात आली आहे! उदाहरणार्थ तुम्ही एखादी गेम खेळत असाल आणि त्या गेममध्ये कोपर्यात दिसणारा मॅप तुम्ही सिलेक्ट केला तर तो मॅप त्या दुसर्या स्क्रिनवर दिसेल जेणेकरून गेम खेळताना तो मॅप तुम्ही मोठ्या रूपात व सहज पाहू शकाल!
त्या स्क्रिनवर गेम खेळताना यूट्यूब, ट्विचवरील व्हिडिओ लावू शकता. गेम्समधील मॅप्सवर झुम करू शकता. डिस्कॉर्डवरील चॅट पाहू शकता यापैकी काही नको तर लॅपटॉपच्या CPU व GPU परफॉर्मन्सबद्दल सर्व माहिती दर्शवली जाईल! हा दुसरा डिस्प्ले टचस्क्रिन असल्यामुळे वापरण्यास आणखी सोपा असेल. असे दोन स्क्रीन असलेले लॅपटॉप यापूर्वीसुद्धा आले आहेत मात्र मुख्य स्क्रिन त्याच लॅपटॉपच्या दुसर्या डिस्प्लेवर मिरर करण्याची सोय प्रथमच देण्यात आली आहे! यापूर्वी आलेला एसुसचा लॅपटॉप ज्यामध्ये टचपॅड ऐवजी टचस्क्रिन डिस्प्ले देण्यात आला होता जो टचपॅड म्हणून वापरता येतो! याचा डेमो https://youtu.be/lvNKG5mc_iQ?t=226 इथे पाहू शकाल.
या लॅपटॉपचा मुख्य डिस्प्ले १५ इंची 1080p रेजोल्यूशन असलेला असून याचा रिफ्रेश रेट 144Hz असेल ज्याला 240Hz/4K HDR चाही पर्याय उपलब्ध आहे! या गेमिंग लॅपटॉपमध्ये इंटेलचे नवीन 9th Gen Core i9 Octa Core प्रोसेसर असून 32GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे! ग्राफिक्स कार्डसुद्धा नवं Nvidia GeForce RTX 2080 Max Q आहे! Omen X 2S साठी खास कुलिंग सिस्टम बसवण्यात आलेली आहे ज्यामध्ये लिक्विड मेटल कंपाऊंड आहे जे थेट सीपीयूला जोडलेल असेल ज्यामुळे लॅपटॉपचं तापमान नियंत्रित राहील!
HP Omen X 2S
हा 22mm जाडीचा गेमिंग लॅपटॉप असून हा जून महिन्यात बाजारात उपलब्ध होईल व याची किंमत 2099.99 डॉलर्स (~ ₹१,५०,०००) पासून सुरू होईल! हा लॅपटॉप भारतात उपलब्ध होण्यास आणखी कालावधी लागू शकतो.