स्पेसएक्सया अमेरिकन खाजगी संस्थेने त्यांच्या फाल्कन हेवी या जगातल्या सर्वात मोठ्या यानाचं पुन्हा एकदा यशस्वी उड्डाण करून याचे तिन्ही रॉकेट बूस्टर्स पुन्हा वापर करण्यासाठी यशस्वीरीत्या पृथ्वीवर लँड करून दाखवले आहेत. तिन्ही रॉकेट बूस्टर्स पृथ्वीवर परत आणण्याची ही स्पेसएक्सचीही पहिलीच वेळ आहे. या तीन पैकी दोन बूस्टर्स जमिनीवर तर एक समुद्रात ड्रोनशिप नावच्या बोटवजा लॅंडींग पॅडवर लँड झालेले आहेत!
फेब्रुवारी २०१८ मध्ये फाल्कन हेवी यानाचं पहिलं उड्डाण झालं होतं हे उड्डाण यशस्वी ठरलं तरी तीनपैकी दोनच बूस्टर्स यशस्वीरीत्या लँड झाले होते मात्र तिसरा बूस्टर समुद्रात कोसळला होता. यावेळी मात्र स्पेसएक्सने तिन्ही बूस्टर्स लँड केले असून हे आता पुढच्या अंतराळ मोहिमांमध्ये वापरता येतील! हे बूस्टर्स मूळ रॉकेट अवकाशात सोडून पृथ्वीकडे परत निघतात आणि यांचा पुन्हा वापर करणं शक्य होतं.
या आज पार पाडलेल्या मोहिमेच नाव अरबसॅट 6A (Arabsat 6A) असं आहे. नासाच्या केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा येथे ही मोहीम पार पडली. याचा लाईव्हस्ट्रिम व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.