डिज्नी (Disney) ने त्यांची बर्याच दिवसांपासून चर्चा सुरू असलेली स्ट्रिमिंग सेवा आज जाहीर केली असून ही सेवा १२ नोव्हेंबरपासून अमेरिकेत उपलब्ध होईल! या सेवेचं नाव डिज्नी प्लस असं असणार आहे. या सेवेची किंमत $6.99/महिना (~₹४८५) व $69.99/वर्ष (~₹४९००) अशी असेल. भारतीय बाजारात उपलब्धतता किंवा किंमतीबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
डिज्नीच्या केव्हीन मेयर यांनी कंपनीच्या या नव्या उत्पादनाची आज गुंतवणूकदारांना माहिती दिली. यावेळी Disney+ अॅप इंटरफेससुद्धा दाखवण्यात आला आहे. नेटफ्लिक्सप्रमाणेच आडव्या रांगामध्ये आपल्याला चित्रपट, मालिका यांची यादी पाहता येईल. मात्र याचं वेगळेपण म्हणजे वर आपल्याला पाच स्वतंत्र नावे असलेली जागा दिसेल ज्यामध्ये डिज्नीसोबत त्यांच्याच पिक्सार, मार्व्हल, स्टार वॉर्स व नॅशनल जिओग्राफिक यांना स्थान दिलेलं असेल. त्यानुसार ज्या त्या franchise चा चित्रपट/मालिका आपण सहज पाहू शकू…
डिज्नी प्लसची सेवा जवळपास सर्वच उपकरणांवर उपलब्ध होत असून स्मार्ट टीव्ही, वेब ब्राऊजर, टॅब्लेट्स, स्मार्टफोन्स, गेम कॉन्सोल्स, क्रोमकास्ट,इ अशा सर्व ठिकाणी आपण डिज्नी प्लस सेवा स्ट्रिम करू शकणार आहोत.
Disney+ च्या सभासदांना प्रोफाइल्स जोडता येणार असून त्यानुसार घरातील सर्वांना स्वतःची वेगळी प्रोफाइल देता येईल व त्यानुसार कंटेंट पाहता येईल. लहान मुलांसाठी पॅरेंटल कंट्रोल्ससुद्धा देण्यात आले आहेत. या सेवेमधील सर्व कंटेंट ऑफलाइन पाहण्यासाठी डाऊनलोड सुद्धा करता येणार आहे. 4K HDR सपोर्टेड टीव्ही असल्यास त्या प्रकारचा कंटेंट सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
खास डिज्नी प्लससाठी नव्याने कंटेंट तयार करण्यात येणार असून याबद्दलसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. मार्व्हलसोबत फाल्कन, विंटर सोल्जर यांच्यावर आधारित मालिका, सोबत लोकी व हॉकआय यांची लाईव्ह अॅक्शन, मोंस्टर्स. इंक शो, स्टार वॉर्सची मालिका तयार करण्यात येत आहे.
गेले कित्येक महीने अनेक स्ट्रिमिंग सर्व्हिसेस/ टीव्ही चॅनल्सवरून नेहमीचा करार रद्द करण्याचे प्रकार पाहून लवकरच डिज्नी स्वतःची सेवा आणणार हे स्पष्ट होत होतं. त्यांचे स्वतःचे सर्व चित्रपट डिज्नी प्लस वर उपलब्ध होणार आहेतचं शिवाय आता 21st Century Fox च्या अधिग्रहणानंतर त्यांचेही सर्व चित्रपट/मालिका डिज्नीकडे उपलब्ध होतील!
आता नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, अॅपल यांना डिज्नीच्या मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. मनोरंजन क्षेत्रात या सर्वांपेक्षा डिज्नीकडे साहजिकच फार मोठी ताकद असून अनेकांनी डिज्नी या क्षेत्रात एकाधिकारशाहीसुद्धा निर्माण करू शकेल अशी भीती व्यक्त केली आहे. ज्या वेगाने डिज्नीने इतरांकडून चित्रपट/मालिका खेचून घेतल्या आहेत त्यावरून त्यामध्ये तथ्य सुद्धा असू शकेल. ही सेवा आधीच उपलब्ध सेवांसमोर कशा प्रकारे चालेल हे येणार्या काळात कळेलच…
Search Terms : Disney+ streaming service launched to be available from November