गेलं पूर्ण वर्षं जगभर स्मार्टफोन यूजर्सना वेड लावत प्रचंड लोकप्रिय झालेली गेम म्हणजे पब्जी (PUBG – प्लेयर अननोनस् बॅटलग्राऊंड) मोबाइल… वर्ष उलटल्यावरही लाखो लोक रोजच्या रोज ही गेम त्यांच्या स्मार्टफोन्सवर खेळत असतात. आज या गेमला अँड्रॉईडवर उपलब्ध होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त पब्जीकडून प्लेयर्ससोबत जल्लोष व्यक्त केला जात आहे. यासाठी प्रसिद्ध संगीतकार अॅलन वॉकरचं गाणं समाविष्ट करण्यात आलं असून गेम खेळताना प्लेयर्सना मोठा केकसुद्धा पाहायला मिळेल! 0.11.5 आज उपलब्ध होत असून नवी वाहनं (रिक्षा), G36C बंदूक, डायनामिक वेदर अशा बऱ्याच गोष्टी जोडण्यात आल्या आहेत.

ही गेम प्रसिद्ध होण्याचं एक कारण म्हणजे ही गेम मोफत उपलब्ध आहे. याच गेमचं कम्प्युटरसाठीची आवृत्ती मात्र ९९९ रुपयात मिळते त्यामुळे काही महिने प्रसिद्ध असलेली पीसी आवृत्ती आता तितकी लोकप्रिय राहिली नाही. उलट पब्जी मोबाइलने मात्र मोबाइल गेमिंग विश्व बदलून टाकलं. गेल्या वर्षीची सर्वात लोकप्रिय मोबाइल गेम ठरली आणि गेम अवॉर्डस् २०१८ मध्येही पुरस्कार मिळाला! डिसेंबर महिन्यापर्यंतच २० कोटी लोकांनी ही गेम डाउनलोड केली होती!
मात्र या लोकप्रियतेचा आता उलट परिणाम पाहायला मिळतोय. भारत असा देश जिथे मोफत मिळालेल्या गोष्टीचा अगदी शेवट होईपर्यंत वापर केला जातो याचंच हे आणखी एक उदाहरण… बाकी कुठेच पाहायला न मिळणारा पार टोकाला जाऊन शेवट करणारा प्रतिसाद इथेच मिळतो! फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि आता या गेम बाबतही तेच दिसून आहे. अनेक विद्यार्थ्यांना आता या गेमचं इतकं व्यसन लागलं आहे की यावरून अनेक गैरप्रकार झाल्याचं उघडकीस येत आहे.
अनेक पालकांच्या अशा तक्रारी येऊ लागल्या आहेत की या गेममुळे विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. मित्र ती गेम खेळतात म्हणून मलाही गेम खेळायची आहे आणि मग त्यासाठी चांगल्या स्मार्टफोनचा हट्ट करणे तो हट्ट न पुरवल्यावर अगदी आत्महत्येसारखं पाऊल उचलणे असे प्रकार इथे घडू लागले! मध्यंतरी पाणी समजून एकाने ऍसिड पिल्याचीही बातमी आली होती. कालच कर्नाटकात एकाने अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये ही गेम कशी खेळायची हे लिहिलं असल्याची बातमी होती. काही दिवसांपूर्वीच दोन जण गेम खेळताना लक्ष नसल्यामुळे रेल्वेसमोर अपघात होऊन गेले. आता असे प्रकार घडल्यावर बॅनची मागणी जोर धरू लागल्यास आश्चर्य वाटू नये.
हे पुढं जात जात एका अकरा वर्षीय मुलाने या गेमविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. तेथून या गेमवर बॅनच्या मागणीची सुरुवात झाली म्हणण्यास हरकत नाही. आता हे प्रकरण थेट या गेमवर थेट बॅन लागू करण्यापर्यंत गेलं असून यासंदर्भात जवळपास १६ जणांना अटक झाली आहे. स्वतःच्या फोनवरील गेम खेळल्याबद्दल अटक… वाचण्यास विचित्र वाटत असलं तरी सुरत व राजकोटमध्ये हे घडलं आहे. अनेक कॉलेजेस मध्येही अशा प्रकारचा बॅन लावला गेला आहे पण कॉलेजमध्ये तो अंमलात आणणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नाहीच. त्यामुळे हॉस्टेलसारख्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असणार हे उघड आहे… आता खाली आम्ही माहिती देत आहोत जी तुम्हालाही फारशी माहित नसेल…
- पब्जी मोबाइलचं Content Rating Rated for 16+ Strong violence असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. प्ले स्टोअरवर पाहू शकता. १६ वर्षांवरील यूजर्सनीच गेम खेळावी…
- हे असं असूनही अनेक पालक स्वतःहून त्यांच्या १६ वर्षाहून लहान असणार्या मुलांनाही ही गेम खेळायला देत असल्याच निदर्शनास आलं आहे! जे नक्कीच चुकीच आहे.
- गेम मोफत असल्यामुळे आणि गेममध्ये अनेक मित्रांसोबत एकाच वेळी गेम खेळण्याची सुविधा आहे त्यामुळे मित्रांना सोबत घेऊन गेम खेळण्याची आवड अनेकांना निर्माण झाली. ज्याचं रूपांतर काही दिवसांनी व्यसन लागल्याप्रमाणे झालं.
- अगदी आता दुकानात नवा फोन विकत घ्यायला गेल्यास दुकानदार दुसऱ्या सुविधांऐवजी ह्यात पब्जी चांगलं चालतय घ्या हेच असे सांगून ग्राहकांना फोन्स विकत आहेत!
- पब्जी मोबाइलतर्फे अधिकृत पत्रक काढून पुढील गोष्टी सांगण्यात आल्या आहेत कि आम्ही पालक, शिक्षक व सरकारी संस्थांसोबत पूर्णपणे शहरी करण्यास तयार आहोत त्यानुसार गेममध्ये योग्य त्या टूल्स/पर्यायांचा समावेश केला जाईल व त्याप्रमाणे गेममध्ये सुधारणा केल्या जातील.
- गेम खेळण्यावर इतर कोणी बॅन लावण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःला काही वेळेसंबंधी बंधने घालायला हवी आहेत. आजूबाजूच भान ठेवून अशा गोष्टी वापरायला हव्यात…
आता जगभरातील एकंदर गेमिंग विश्वाचं चित्र पाहिलं तर हि गेम भारतातच फार लोकप्रिय झाली आहे. एकूण क्षेत्राचा विचार करता भारतात अजूनही कॉन्सोल गेमिंग किंवा पीसी गेमिंग बाल्यावस्थेत आहे म्हणायला हरकत नाही. त्यात गेम्स विकत ना घेता टोरेंटवरून डाउनलोड करून पायरसीला देण्यात येणारं प्राधान्य नेहमीची गोष्ट झाली आहे. तसे पाहता गेमिंगमधील उलाढाल सुद्धा कोटींच्या घरात आहे. मात्र आपल्याकडं त्या दृष्टीने प्रमाण कमी आहे. त्यात असा मोफत पर्याय उपलब्ध झाला की तो अचानक फार गाजतो. उदा. क्लॅश ऑफ क्लॅन्स, कॅडी क्रश (ज्याचंही अनेकांना व्यसन लागलं होतं!) पण यानंतर व्यसन लागणं किंवा प्रमाणबाहेर वेळ घालवण यासाठी गेम्सना दोषी धरता येणार नाही. काहीही झालं तरी ते मनोरंजनाच साधन आहे. बर्याच देशांमध्ये तर गेमिंगलाही अधिकृत खेळाचा दर्जा देण्यात आला आहे! अनेक जण करियरसाठीही हा पर्याय निवडत आहेत. मात्र सद्य स्थितीत भारतात असं वातावरण निर्माण होणं सहजशक्य नाहीच…
गेली सलग आठ वर्षं संगीत आणि चित्रपट या क्षेत्रांच्या एकत्रित उत्पन्नाहून अधिक उत्पन्न गेमिंग इंडस्ट्री मिळवते आहे!
या पार्श्वभूमीवर गेम्सना सरसकट बॅन करणं चुकीच आहे असं मत मांडत आहोत कारण ते प्रत्येकाच स्वातंत्र्य आहे की कम्प्युटर/फोन्सवर कुठली गोष्ट वापरावी/पहावी… अशावेळी गेमिंग म्हणजे वाईटच असं जुनं गृहीतक धरून चालू नये. अनेक शास्त्रीय संशोधनांनुसार गेम्समुळेही मेंदू तल्लख राहण्यास मदत होत असल्याच समोर येत असतंच (उदा. माइनक्राफ्ट). मात्र त्याचवेळी अशा गेम्समुळे काही प्रमाणात हिंसक वृत्तीही वाढीस लागत असल्याच काही जणांचं मत आहे… याचा अर्थ असाही नाही की त्या गेम्सच्या वापरामुळे सामाजिक समतोल बिघडतोच. हे भान ज्याचं त्यानं पाळायला हवं आहे की विद्यार्थी असतील तर त्यांच्या पालकांनी लक्ष ठेवणं हट्ट करत असतील तर त्यांना तसं समजावणं हे पालकांच त्या त्या वेळी इतर गोष्टींसोबत कर्तव्य म्हणता येईल. कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केली की तिचा शेवट वाईट होतो हे आपणा सर्वांना ठाऊक असेलच…

पब्जी मोबाइलने खास भारतीय गेमर्ससाठी सहा तासांची मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला असून बर्याच यूजर्सना वर दाखवल्याप्रमाणे बॅनर दिसू लागला आहे.
या लेखामध्ये अजूनही काही मुद्दे जोडले जाऊ शकतात. गेमिंगसंबंधित ही माहिती पोहचण्यासाठी हा लेख नक्की शेअर करा…