गूगलच्या यूपीआय आधारित पेमेंट अॅप ‘गूगल पे’ (पूर्वीचं तेझ) मध्ये आता रेल्वे तिकीट आरक्षित करता येणार असून अॅपमध्येच बुकिंग करून पे करण्याची सोय देऊन तिकीट बुकिंग सहज केलं आहे. आयआरसीटीसीच्या अॅपमध्ये आपण सध्या गूगल पे द्वारे पैसे देऊ शकतोच मात्र आता गूगल पेमध्येच ही सोय उपलब्ध झाल्यामुळे आणखी सोयिस्कररित्या तिकीट्स काढता येतील…
यासाठी आता गूगल पे अॅपमध्ये Trains नावाचा पर्याय दिसेल जो Businesses अंतर्गत दिलेला आहे. त्यावर टॅप करून आपण रेल्वे तिकीट बुक, कॅन्सल, स्टेट्स पाहू शकाल. मात्र इतर ट्रेन बुकिंग सुविधा असलेल्या अॅप्स (पेटीएम, फोनपे) प्रमाणे या सुद्धा अॅपला आयआरसीटीसीचा स्वतःचा लॉगिन आधी असलाच पाहिजे. तसा नियमच असल्याच सांगण्यात आलं आहे.
गूगल पेवर आता वीज बिल, रीचार्ज, फोन बिल्स, मेट्रो तिकीट्स, कॅब बुकिंग, बस बुकिंग, इ अनेक पर्याय/सेवा उपलब्ध करून देण्यात आले असून यूपीआय या सोप्या पेमेंट पद्धतीमुळे दिवसेंदिवस अधिकाधिक लोक गूगल पेचा वापर करत असल्याच पाहायला मिळत आहे…!