दरवर्षी चर्चेत असलेल्या युट्युबर्सना घेऊन वर्षाअखेरीस एक खास व्हिडिओ युट्युब स्वतः बनवतं…! मात्र यावेळच्या व्हिडीओला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद लाभलेला नसून उलट आता त्यांच्याच प्लॅटफॉर्मवर त्यांचाच व्हिडीओ सर्वाधिक डिसलाईक असलेला व्हिडीओ बनला आहे!
रिवाइंड २०१८ या व्हिडिओला तब्बल १ कोटी यूजर्सनी डिसलाईक (नापसंती) दर्शवली आहे!
आजवर सर्वाधिक नापसंती असलेला व्हिडीओ जस्टिन बिबर या गायकाचा ‘बेबी’ नावाच्या गाण्याचा २०१० मध्ये आलेला व्हिडीओ होता. आता आठ वर्षांनी या नको असलेल्या विक्रमाला मागे टाकत युट्युब रिवाइंड २०१८ ने आघाडी घेतली आहे आणि ते सुद्धा अवघ्या आठ दिवसातच…! गेल्या काही वर्षांपासून हे डिसलाईकचं प्रमाण वाढत होतंच मात्र यावेळी बरेच यूजर्स फारच नाराज असल्याचं दिसून येत आहे!
युट्युबच्या क्रिएटर्सकडे लक्ष देण्याऐवजी जाहिरातदारांना खूष करण्याच्या प्रयत्नावर यूजर्स नाराज झाले असून या वर्षात युट्युबवर घडलेल्या बऱ्याच मोठ्या गोष्टींना आणि मोठ्या युट्युबर्सना समाविष्ट न केल्यामुळे थेट डिसलाईक करून निषेध नोंदवण्यास सुरुवात केली आहे. सर्वाधिक सबस्कायबर्स असलेला प्युडिपाय (PewDiePie), शॉन डॉसन, लोगन पॉलच वादग्रस्त प्रकरण, लोगन आणि केएसआय यांच्यातील युद्धाचा (जी सर्वात मोठी पेड सिरीज होती) अनुल्लेख, निंजा नावाच्या गेम स्ट्रीमरचा समावेश (जो खरेतर युट्युबऐवजी ट्विच या दुसऱ्या गेम स्ट्रीम साईट वर प्रसिद्ध आहे), फोर्टनाईटचा अतिरेकी उल्लेख, विल स्मिथ व इतर टीव्ही सेलिब्रिटीजचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना केलेला समावेश यामुळे युट्युब त्यांच्या क्रिएटर्स (व्हिडीओ तयार करणारे) व प्रेक्षक यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी जाहिरातदारांच्या धमक्यांना बळी पडत त्यांच्या मनाप्रमाणे प्लॅटफॉर्म चालत असल्याचं सांगितलं आहे. अनेक युट्युबर्सनीसुद्धा यावर नाराजी व्यक्त करणारे व्हिडीओ टाकत आहे.
युट्युबवर सर्वाधिक ‘डिसलाईक्स’ असलेले व्हिडिओ!
- YouTube Rewind 2018: Everyone Controls Rewind
- Baby : Justin Bieber featuring Ludacris
- It’s Everyday Bro : Jake Paul featuring Team 10
- Call of Duty: Infinite Warfare Reveal Trailer
- Can this video get 1 million dislikes? : PewDiePie
- Despacito : Luis Fonsi featuring Daddy Yankee
- Friday : Rebecca Black
- How It Is (Wap Bap …) : BibisBeautyPalace
- Cortando o Botão do YouTube : Aruan Felix
- Masha and the Bear : Recipe for Disaster
मार्कस ब्राऊनली (MKBHD) ने तर स्वतः त्या व्हिडीओमध्ये असूनही यावेळी युट्युबकडून कोणत्या चुका झाल्या यावर प्रकाश टाकला आहे!