आयबीएमने दिलेल्या माहितीनुसार ते रेडहॅट या प्रसिद्ध ओपन सोर्स सॉफ्टवेअर कंपनीचं अधिग्रहण करत असून तब्बल ३४ बिलियन डॉलर्स (जवळपास अडीच लाख कोटी ₹) एव्हढी मोठी रक्कम अशा कंपनीसाठी मोजली आहे जी त्यांचं मुख्य उत्पादन ग्राहकांना चक्क मोफत देते! रेडहॅटची जगभरात ओळख एक उत्तम ओपन सोर्स सॉफ्टवेअर कंपनी अशीच असून त्यांची महत्वाची उत्पादने सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहेत. अगदी ओरॅकलसारखी मोठी कंपनीसुद्धा त्यांची हीच सॉफ्टवेअर्स वापरते.
ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे असं सॉफ्टवेअर ज्याच्याकडे त्या सॉफ्टवेअरचे मालकी हक्क आहेत त्याने ते सर्वाना मोफत उपलब्ध करून त्या सॉफ्टवेअरचा कोड पाहायला, अभ्यास करायला व तो बदलून स्वतः वितरित करण्याची परवानगी दिलेली आहे!
लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिम अशाच ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रकारात मोडते. ह्या ऑपरेटिंग सिस्टिमचे विविध वितरक आता बाजारात असून प्रत्येकच डिस्ट्रो (डिस्ट्रिब्युशन) आता मोफत उपलब्ध असते. उदा. लिनक्स, उबंटू, फेडोरा, मिंट, इ. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सर्व मोफत असताना कंपन्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम पैसे देऊन का वापरतात? तर ऑपरेटिंग सिस्टिमला नंतर लागणार सपोर्टसुद्धा दिला जात असल्यामुळे विंडोज वापरलं जातं. मग आता पुन्हा प्रश्न आला की आयबीएमसारखी एव्हढी मोठी कंपनी अशा कंपनीला का खरेदी करेल जी त्यांची उत्पादने मोफत देते … तर कारण असं की रेडहॅट मुख्य सॉफ्टवेअर मोफत देत असली तरी त्यासोबत पैसे मोजून कंपन्यांना सपोर्ट घेता येतो. आणि या सपोर्टमधून रेडहॅटला वर्षाला तब्बल ३ बिलियन डॉलर्स (₹ २२०९५ कोटी) उत्पन्न मिळतं!
अनेक कंपन्या रेडहॅटला सॉफ्टवेअर सपोर्ट देण्यासाठी पैसे मोजतात. या सपोर्ट सिस्टीममधूनच एक समांतर व्यवसाय सुरु आहे ज्याद्वारे रेडहॅट उत्पन्न मिळवतं!
आयबीएम कॉम्प्युटिंगच्या आजवरच्या प्रवासात आघाडीवर राहिली असली तरी क्लाऊड कॉम्प्युटिंगमध्ये मात्र बरीच मागं पडल्याचं चित्र निर्माण झालं होतं. IBM च्या वॉटसन या AI आर्टिफिशीअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) सेवा सुद्धा इतरांच्या मानाने फार प्रगत नाहीत. मात्र आता या रेडहॅटच्या अधिग्रहणामुळे ते बरेच पुढे येणार असून अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्टसारख्या क्लाऊड कॉम्प्युटिंगच्यामध्ये आघाडीवर असलेल्या कंपन्यांशी थेट स्पर्धा होईल. रेडहॅटचा प्रवास सुद्धा अलीकडे खडतर होता. जूनमध्ये आर्थिक अहवाल जाहीर झाल्यावर त्यांचे शेअर्स एका दिवसात १४ टक्के कोसळले होते. त्यामुळे या विक्रीमुळे दोन्ही कंपन्याना एकमेकांची चांगलीच मदत होणार असल्याचं दिसून येत आहे.
[NEWS] @IBM to acquire Red Hat and become the world’s leading #hybridcloud provider. https://t.co/goihRICRr3 https://t.co/G8SKS5gsVk pic.twitter.com/GJL4UmBu1B— Red Hat, Inc. (@RedHat) October 28, 2018
रेडहॅटच्या या विक्रीमुळे डेव्हलपर मंडळींमध्ये मात्र नाराजी पाहायला मिळत आहे. बऱ्याच जणांनी याविषयी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. रेडहॅट ओपन सोर्स जगतात सर्वात मोठं नाव समजलं जातं. सध्यातरी आयबीएमकडून रेडहॅटचं ओपन सोर्स मॉडेल तसंच ठेवलं जाईल असं सांगितलं आहे. रेडहॅट आता IBM मधील हायब्रीड क्लाऊड ऑर्गनायझेशन मध्ये स्वतंत्र युनिट म्हणून काम करेल.
या अधिग्रहणाबद्दल अधिकृत माहिती : IBM to aquire Red Hat and become world’s #1 hybrid cloud provider!
search terms : IBM to acquire open source software company Red Hat for 34 billion dollars