
देशातील पहिले वायफाय झोन असणाऱ्या शहराचा मान नुकताच बेंगळुरूने मिळविला. ‘नम्म वायफाय’ या नावाने ही अगदी चकटफू सेवा एम. जी. रोड, ब्रिगेड रोड, सीएमएच रोड या व्यतिरिक्त यशवंतपूर, कोरमंगला आणि शांतीनगर बसस्टँडच्या परिसरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांनीही अहमदाबाद शहरामध्ये मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. दिल्ली सरकारचीही अशीच योजना प्रस्तावित आहे.
नुकत्याच बिहारमध्ये पार पडलेल्या ‘ई-बिहार’ परिषदेत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘डायल १००’ आणि ‘सिटी सर्व्हेलन्स’ या महत्त्वाकांक्षी योजना सादर केल्या. ‘सिटी सर्व्हेलन्स’ अंतर्गत रस्त्यांवर हजारो सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून प्रवाशांची विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष पुरविण्यात येणार आहे. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मिळणारा डेटा साठवून ठेवण्यासाठी अत्याधुनिक डेटा सेंटरही उभारण्यात येणार आहे. या दोन्ही योजनांद्वारे राजधानी पाटणा गुन्हेमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे वाहनांच्या नंबरप्लेट आणि प्रत्येक व्यक्तीचा चेहरा तपासू शकतील, या दर्जाचे आहेत. या योजनेतून संपूर्ण पाटणा शहरावर २४ तास सीसीटीव्हीची करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT