अपडेट : ३०-१२ -२०१३ आता भारतीय तिरंगा उपलब्ध
हाय गुड मॉर्निंग, व्हॉट्सअॅप ब्रो?… व्हॉट्सअॅपवर हा नित्यनेमाने फिरणारा मेसेज. पण गेल्या काही दिवसांपासून या अॅपवर आणखी एक मेसेज फिरतोय तो म्हणजे… ‘व्हॉट्सअॅपवर भारताचा झेंडा का नाही? हा प्रश्न फॉर्वर्ड करत रहा… व्हॉट्सअॅपचे प्रशासन जागे होईपर्यंत स्वस्थ बसू नका. १५ ऑगस्टपर्यंत भारताचा झेंडा व्हॅट्सअॅपवर आलाच पाहिजे.’
भारताचा तिरंगा ध्वज व्हॉट्सअॅपवर आणण्यासाठी व्हॉट्सअॅप युझर्सनी हे कुजबुज आंदोलन सुरू केले असून सर्व भारतीयांना एकजुटीचे आवाहन केले आहे. व्हॉट्सअॅप हे अॅप्लिकेशन त्यातील स्टिकर्ससाठी प्रसिद्ध आहे. एखादा संदेश पाठविताना त्याबरोबर त्याला पूरक असलेला स्टिकर पाठविण्याची सुविधा यात उपलब्ध आहे. या स्टिकर्समध्ये इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, चीन, जपान, कोरिया व स्पेन या दहा देशाच्या ध्वजांचे स्टिकर्सही आहेत. मात्र, कोट्यावधी युझर्स असलेल्या भारताच्या ध्वजाचा स्टिकर या अॅपमध्ये नाही. त्यामुळे भारतीय व्हॉट्सअॅप युझर्समध्ये प्रचंड नाराजी आहे.
इतर देशांप्रमाणेच भारतीय ध्वजही व्हॉट्सअॅपवर सन्मानाने फडकावा, यासाठी आता भारतीय अॅप युझर्सनी आघाडी उघडली आहे. त्याचाच भाग म्हणून ‘मेसेज मोहीम’ सुरू करण्यात आली आहे. अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा देत हा मेसेज सर्वच ग्रुपमध्ये पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या समर्थनार्थ फेसबुकवरही काही ग्रुप आणि पेजेस सुरू करण्यात आली आहेत.
केंद्राची परवानगी हवी?
भारतीय कायद्यानुसार भारताचा झेंडा वापरण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते, असे काहींचे म्हणणे आहे. मात्र, व्हॉट्सअॅपला कोट्यवधी मिळवून देणाऱ्या भारतासाठी व्हॉट्सअॅप साधी एक परवानगी घेऊ शकत नाही का, असा सवाल काही युझर्सनी केला आहे.
_ स्वप्निल घंगाळे