विंडोज ८ लॉचिंग अनेक गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या आहेत . यामुळे अँड्रॉइड धोक्यात येईल का ? ग्राहक पुन्हा कम्प्युटर खरेदीकडे वळतील का ? विंडोजकडे पुरेसे अॅप्स आहेत का ? या प्रश्नांवर जगभरातील तज्ज्ञ चर्चा करत आहेत . मायक्रोसॉफ्टसह गुगलचे भवितव्यच नव्या लाँचवर अवलंबून असल्याने या चर्चा होणे स्वाभाविक आहे . अॅपलचे टॅबलेट मार्केटमधील स्थान मजबूत असल्याने त्यांचा याचा फरक पडणार नसला तरी सॅमसंग , आसुस , तोशिबा यासारख्या अँड्रॉइड टॅबलेट बनविणा – या कंपन्यांनी विंडोज ८ टॅबलेटच्या निर्मितीची तयारी करून स्वतःचे स्थान डळमळीत होणार याची काळजी घेण्यास सुरूवात केली आहे .
आयपॅड नको असलेल्यांसाठी सध्या अँड्रॉइड टॅबलेटचा पर्याय उपलब्ध असला तरी त्याची विक्री म्हणावी तितकी नाही . गेल्यावर्षी लॉँच झाला तेव्हा गॅलेक्सी टॅब १० . १ हा आयपॅडला उत्तम टक्कर देईल अशी चर्चा होती . मात्र अॅपल विरुद्धच्या खटल्यात सॅमसंगने नमूद केलेल्या माहितीनुसार अमेरिकत केवळ ७ लाख १२ हजार गॅलेक्सीटॅबची विक्री झाली आहे . कंपन्यांनी निर्यात केलेल्या सर्व प्रकारच्या अँड्रॉइड टॅबलेट्सचे आकडे खूप मोठे दिसतअसले तरी कित्येक टॅब विक्रेत्यांकडे पडून असल्याचे आयडीसी या संशोधन संस्थेने म्हटले आहे .
विडोंज ८ मुळे अँड्रॉइड पूर्णपणे इतिहासजमा होणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे . प्रामुख्याने स्वस्तातीलआणि ७ ते १० इंच आकारात उपलब्ध असलेल्या नॉन ब्रँडेड अँड्रॉइड टॅबलेटच्या विक्रीवर फारसा परिणाम होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे . ग्राहक प्रामुख्याने गेम खेळणे , व्हीडिओ पाहणे , गाणी ऐकणे , इंटरनेट अॅक्सेस यासारख्या गोष्टींसाठी अँड्रॉइड टॅबलेट वापरतील असे गार्टनरच्या कॅरोलिना मिलानेसी म्हणतात .हार्डवेअर उत्पादकांनी अॅपलच्या व्यतिरिक्त दुसरी कंपनी टॅबलेट निर्मितीस परवानगी देईल या आशेने अँड्रॉइडसाठी गुगलबरोबर करार केला होता . मात्र आता त्यांनी मायक्रोसॉफ्टसोबतही हातमिळवणी केली आहे .
अँड्रॉइडचे एक बलस्थान म्हणून अॅप्सकडे पाहिले जाते . सध्या गुगल प्ले स्टोअरवर ६ . ७५ लाखाहून अधिक अॅप्सउपलब्ध आहेत . त्याचवेळी मायक्रोसॉफ्टने अजून अॅप स्टोअरची घोषणा केलेली नाही . मात्र विंडोजकडे अँड्रॉइडच्या कितीतरी पट अधिक अॅप्स असल्याचे तज्ज्ञ सांगतात . गुगलनेही विंडोज ८ चा धोका लक्षात घेऊन आता अॅप्स डेव्हलपर्ससाठी नवे दिशानिर्देश जाहीर केले आहेत . कारण हेच डेव्हलपर विंडोज ८ साठीही अॅप तयारकरणार आहेत .