आपल्या फेसबुक न्यूज फिड मध्ये आपण पाहत असलेल्या पोस्ट्स ह्या आपण सर्च केलेल्या, लाइक केलेल्या पेज/पोस्ट यावरून आपली आवड समजून घेऊन आपल्याला दाखवल्या जातात. तुम्ही जर एखाद पेज लाइक केलं असेल तर त्या पेजने पब्लिश केलेल्या सगळ्याच पोस्ट तुम्हाला न्यूज फिड वर दिसत नाहीत ह्याच कारण फेसबुक तुमच्या History/Likes/Preference यावरून तुमच्यासाठी Relevant (तुमच्या आवडी संबंधित) अशाच पोस्ट दाखवतं. मात्र आजपर्यंत यातसुद्धा काही प्रमाणात त्रुटी होत्या म्हणूनच आता नवा अल्गॉरिथ्म जोडून त्यांनी अधिक अनुरूप अशा पोस्ट्स दाखवण्याचा निर्णय घेतलाय!
फेसबुक वरील जाहिराती |
फेसबुकवर आपली लोकेशन(आपण सध्या राहतो ती आणि आपण जिथे जिथे फिरतो ती सुद्धा!) याची नोंद होत असते. (यापासून सुरक्षित राहण्यासाठी लेख वाचा) त्यावरून आपल्याला Suggestion दिल्या जातात आणि मग नंतर Sponsored जाहिरातीसुद्धा यानुसार दिसायला लागतात. या जाहिरातीच फेसबुकच्या उत्पन्नाचा स्त्रोत म्हणता येतील. पण हल्ली वापरकर्ते Adblocker चा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.
अॅडब्लॉकर म्हणजे असा प्रोग्राम ज्यामुळे आपल्याला सर्व वेबसाइटवर दिसणार्या जाहिराती ब्लॉक केल्या जातात/दाखवल्या जात नाहीत! हे शक्यतो ब्राऊजर एक्सटेन्शनच्या रूपात असतात. हे ऑन असताना आपल्याला कोणत्याही साइटवर जाहिराती दिसत नाहीत.
यामध्ये Adblock आणि AdblockPlus(ABP) आघाडीवर आहेत. ही एक्सटेन्शन वापरताच सर्व वेबसाइटवर दिसणार्या जाहिराती बंद होतात अगदी यूट्यूबवर सुद्धा जाहिरातीशिवाय व्हीडिओ दिसतात. वेबसाइटच्या निर्मात्यांना मात्र या प्रोग्राममुळे मोठंच नुकसान होत आहे. त्यामुळे या क्रिएटर लोकांनी अॅडब्लॉकर विरोधात आवाज उठवायला सुरवात केली आहे.
यामधून जाहिरात देणार्याचा विचार व्हावा म्हणूनच दोन दिवसांपूर्वी फेसबुकने पुन्हा Adblocker विरुद्ध उपाययोजना करत Adblocker फिल्टर मधून बाहेर पडत जाहिराती दाखवण्याचा दावा केला. याचा मोठा गाजावाजा सुद्धा झाला मात्र दोनच दिवसात Adblocker Plus ABP यांनी त्यावर सुद्धा मात केली आणि आता पुन्हा फेसबुकवरील जाहिराती लपवता येत आहेत (पुन्हा Block करता येत आहेत) !
या प्रश्नावर उपाय म्हणून Adblocker च्या निर्मात्यांनी काही वेबसाइटला Whitelist (ब्लॉक करण्याच्या यादीतून वगळण्याचा पर्याय दिलाय.
Whitelist करणे म्हणजे काय ? : एखादी साइट जिच्यावर जाहिराती दिसण्याला तुमची हरकत नाही अशा साइटच्या यादीला whitelist म्हणतात. Whitelist च्या यादीत असलेल्या साइटवर अॅड दिसतात.
त्यामुळे “काही” वापरकर्त्यांनी “काही” साइट whitelist केल्या पण यामुळे मुख्य प्रश्न सोडवला गेला असे म्हणता येणार नाही. अॅडब्लॉक अशाच साइटसाठी वापरा जिथे विनाकारण भडिमार केला गेलाय. ज्या साइट तुमच्या उपयोगी पडत आहेत/ तुमच्या भल्यासाठी काम करत आहेत त्यांना Whitelist करा. काही ब्राऊजर आधीपासूनच अॅडब्लॉकची सोय देत आहेत जसे की ओपेरा ब्राऊजर. यांना पुर्णपणे बंदच करावं लागत कारण मोबाइलमध्ये whitelist चा पर्याय सध्यातरी नाहीये!
पाश्चात्य देशांमध्ये Paypal द्वारे काही वेबसाइट Donation स्वीकारतात ज्यामुळे वापरकर्ते स्वखुशीने काही रक्कम वेबसाइट निर्मात्यांना देतात आणि मग वेबसाइट निर्माते एकही जाहिरात दाखवत नाहीत! याच आणखी एक रूप म्हणजे पेड साइट जसे की यूट्यूब रेड ज्यामध्ये यूजर साइटच्या मालकांना पैसे देतो आणि मग अॅड बंद होतात. भारतात सध्यातरी हा पर्याय उपलब्ध नाही. (Paypal ला भारतीय बँका तितका सपोर्ट करत नाहीत). Paytm सारख्या मोबाइल वॉलेट कंपन्या यावर काम करत असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही महिन्यात पायरसीविरूद्धसुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यवाही सुरू झाली असून किकअॅस, टोरेन्टझ या साइट बंद करण्यात आल्या आहेत. या साइट टोरेन्टच्या जगात सर्वात प्रसिद्ध होत्या. भारतात तर अलीकडे 3-4 चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच या साइटवर डाऊनलोडसाठी उपलब्ध झाले होते ! यामुळे चित्रपटांच्या निर्मात्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं होतं. यासारख्या घटनांमुळे त्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे आयुष्यसुद्धा नाही म्हटलं तरी अडचणीत येतच ! आपण बर्याच वेळा पाहतो की भारतात सॉफ्टवेअर/अॅप्लिकेशन विकत घेण्यापेक्षा पायरसी करण्याकडे कल राहतो ! मग हेच नंतर चित्रपट,गाणी,अॅप्लिकेशन अशा सर्वच बाबतीत घडत जातं. बर्याच जणांना तर माहीत सुद्धा नाही की ते गाणी,चित्रपट डाऊनलोड करतात ते अवैध आहे. (होय अशा प्रकारे गाणी/चित्रपट डाऊनलोड करण्यावर कायद्यांनी बंदी आहे). त्यात आपल्याकडे जवळपास सर्वच पीसीवर पायरेटेड विंडोज ओएस असते! पायरसी करताना होणार्या धोक्यांची जाणीव होईपर्यंत हे सुरूच राहणार आहे. याविषयी स्वतंत्र लेखात नंतर अधिक सविस्तर बोलू..
पायरसी म्हणजे डिजिटल प्रकारात पुस्तकं/ सॉफ्टवेअर/ व्हिडिओ/ ऑडिओ यासारख्या साहित्याची चोरी. ही चोरी पुस्तके स्कॅन करून, सॉफ्टवेअरच्या Keys वापरुन, व्हिडिओ डाऊनलोड करून यांच्या निर्मात्यांना श्रेय न देता इंटरनेट/टोरेन्ट/डीव्हीडीवर परस्पर विक्री करणे होय. पायरसी करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
अॅडब्लॉकरचं प्रकरण सुद्धा काही प्रमाणात पायरसीच्याच वळणावर आलं आहे. बर्याच गोष्टींमध्ये यांचं साधर्म्य आढळतं. येत्या काळात कंपन्या आणि वापरकर्ते यांच्यात यावरून मोठे वाद होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. पायरसीमध्ये आणि अॅडब्लॉकमध्ये त्या त्या ठिकाणी निर्मात्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. यूट्यूबवर अपलोड होणार्या व्हिडिओजच्या क्रिएटरना केवळ तेथील जाहिरातींमधूनच उत्पन्न मिळत असतं.
या अॅडब्लॉक गोष्टीला खरेतर या वेबसाइटसुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहेत. साइट उघडली की जाहिरातींचा अक्षरशः भडिमार केला जातो. मग वापरकर्तेसुद्धा चिडून/संतप्त होऊन अॅडब्लॉकर बसवतात. यूट्यूबच्या जाहिरातींचा तर वापरकर्त्यांमध्ये प्रचंड तिटकारा आहे. भारतात एकतर इंटरनेटचा वेग आधीच कमी असतो त्यात यूट्यूबवर व्हिडिओ पहायला गेलं तर समोर जाहिराती सुरू होतात त्यात कहर म्हणजे त्या सुद्धा Buffer (लोड होण्यासाठी वेळ) व्हायला लागतात ! काही व्हिडिओ सुरू असताना अधून मधुनसुद्धा जाहिराती दिसतात म्हणजे व्हिडिओ पाहण्याचा पूर्ण आनंदच हिरावला जातोय! याकडे वेब डेवलपरने लक्ष द्यायला हवय. कारण वाचकांचा/वापरकर्त्यांचा राग पुर्णपणे चुकीचा मानता येणार नाही! मोबाइल साइटवरसुद्धा मोठ्या प्रमाणात जाहिराती येत आहेत. काही साइटवर तर साइट पाहणं/वाचणं देखील अशक्य होऊन जातं!
हल्ली बातम्या/न्यूजसाठीच्या वेबसाइटवर अॅडब्लॉकरचा वापर करणार्या वाचकांना अॅडब्लॉकर बंद करा असे मेसेज दिसत आहेत, तुम्हीही पाहिले असतीलच. यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत ह्या साइट तुम्हाला Whitelist कराव्याच लागतील. कारण या साइट आपण दैनंदिन वापरतो आणि ह्या साइटसुद्धा आपल्याला अपडेटेड ठेवण्यासाठी त्यांच्या हजारो कर्मचार्यामार्फत काम करत असतात.
Adblock लावण्यासाठी लिंक्स : गूगल क्रोमसाठी Get AdBlock, Get Adblock Plus
Whitelist कसे करायचे : तुमच्या अॅडब्लॉक पर्यायांमध्ये मध्ये जा आणि Don’t run on this domain निवडा
मराठीटेक तर्फे आमचं आणखी एक आवाहन आहे पायरसीला खतपाणी घालू नका. ओरिजिनल/ऑफिशियल साइटवरूनच विकत घेऊन डाऊनलोड करा. गाण्यांसाठी Gaana, Saavn, Hungama अशा अॅप्लिकेशनचा वापर करा. जरी समजा काही कारणांसाठी वापर करणारच असाल तर किमान त्या content च्या निर्मात्याला श्रेय द्या (क्रेडिट्स). त्यांनी त्या सॉफ्टवेअर/अॅप्लिकेशनसाठी घेतलेली मेहनत लक्षात घ्या. पायरसी/टोरेन्टयुक्त डाऊनलोडसमुळे तुमच्या मोबाइल/पीसीला धोका निर्माण होऊ शकतो!