तुम्हाला गेल्या काही दिवसात व्हॉट्सॲपवर एक पॉप अप आलेला असेल ज्यावर व्हॉट्सॲप त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काय बदल करणार आहे आणि त्याला तुमची संमती आहे का असं परत एकदा विचारण्यात आलं आहे. २०१४ या वर्षी फेसबुकने व्हॉट्सॲप खरेदी करून त्याची पूर्ण मालकी स्वतःकडे घेतली होती. आता ते फेसबुक व्हॉट्सॲपसोबत शक्य त्या मार्गे जोडून व्हॉट्सॲप यूजर्सचा डेटा मिळवणार आहेत असं दिसत आहे. प्रायव्हसी पॉलिसी म्हणजे गोपनीयता किंवा तुमचा खासगी डेटा पुढे कशा प्रकारे शेयर करण्यात येईल हे या नव्या पॉलिसीमध्ये सांगण्यात आलं आहे.
व्हॉट्सॲपने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेली प्रायव्हसी पॉलिसी तूर्तास लागू करणार नसून ८ फेब्रुवारी ऐवजी १५ मेनंतर ही नवी पॉलिसी लागू करण्यात येईल असं सांगितलं होतं.
तुम्ही नवी पॉलिसी Agree केली नाही तरी तुमचं अकाऊंट बंद होणार नाही मात्र एक एक करत व्हॉट्सॲपवरील सुविधा कमी करण्यात येतील असं व्हॉट्सॲपकडून सांगण्यात आलं आहे. कॉल्स येण बंद होईल मग नोटिफिकेशन बंद होतील, मेसेजेस बंद होतील असं टप्प्या टप्प्याने एक एक सोय बंद करण्यात येईल.
पुन्हा एकदा व्हॉट्सॲपने ते यूजर्सची माहिती गोळा करत असल्याचं सांगितलं आहेच मात्र यावेळी ते नेमकी कोणती माहिती मिळवत आहेत हे जाहीररित्या सांगितलं आहे. फोन नंबर, लोकेशन, आयपी अॅड्रेस, फोन मॉडेल, ओएस, स्टेट्स, प्रोफाइल पिक्चर, ग्रुप्स या सर्व गोष्टींची माहिती साहजिकच त्यांच्या कडे जाणार आहे. यापुढे जर तुम्हाला व्हॉट्सॲप वापरायचं असेल तर नवे नियम मान्य करूनच वापरता येईल अन्यथा व्हॉट्सॲप अकाऊंट बंद करून दुसऱ्या ॲपचा वापर सुरू करावा लागेल. थोडक्यात आम्ही डेटा तर घेणारच आहोत फक्त तुमची परवानगी मागतोय असं फेसबुकचं म्हणणं आहे.
फेसबुक कंपनीने व्हॉट्सॲप यूजर्सचा डेटा कसा वापरला जाईल, बिझनेसेस फेसबुकच्या सेवांचा वापर करुन चॅट्स कसे साठवू शकतील आणि इतर उत्पादनामध्ये वापरू शकतील, मेसेंजरमध्ये कशा प्रकारे शेयर केला जाईल ही माहिती दिली होती. मात्र हा डेटा शेयर करण्याला अनेकांनी विरोध दर्शवत सिग्नल, टेलिग्रामकडे वळण्यास सुरुवात केली आणि यामुळेच ताळ्यावर येत व्हॉट्सॲपने आपला निर्णय पुढे ढकलला होता. मात्र यामध्ये काहीही बदल केलेला दिसत नाही.
काही दिवसांपूर्वी कोर्टामध्ये याबद्दल उत्तर देताना त्यांनी देशातील बरेच zomato, koo, Ola, truecaller असे Apps व्हॉट्सॲपपेक्षा जास्त डेटा गोळा करतात असंही सांगण्यात आलं आहे! त्यामुळं आम्ही काही फार वेगळं करत नाही असं व्हॉट्सॲपचं म्हणणं आहे. यासोबत त्यांनी असंही सांगितलं आहे की त्यांच्या बऱ्याच यूजर्सनी नवी पॉलिसी स्वीकारली आहे! ज्यांनी स्वीकारली नाही त्यांना त्याबाबत सारखा अलर्ट देण्यात येईल.
खरेतर त्यांनी हा बदल करण्याचा निर्णय पूर्णपणे मागे घेणं अपेक्षित होतं. तुम्ही जर आधीच सिग्नल किंवा टेलिग्राम वापरण्यास सुरुवात केली असेल आणि तुमच्या संपर्कातील इतरांनाही सोबत घेत असाल तर ते सुरू ठेवा. अर्थात प्रत्येकाला व्हॉट्सॲप सोडणं शक्य नाही हे मान्य आहे पण अशा मोठ्या कंपन्याना जर वेळीच धडा शिकवला नाही तर पुढेही त्यांची मनमानी सुरूच राहील. सरकारकडून दबाव आणला गेला तर हा निर्णय अजूनही माघारी घेतला जाऊ शकतो. जर्मनीने ही नवी पॉलिसी त्यांच्या देशात बॅन केलेली आहे.
व्हॉट्सॲपला काही लोकप्रिय पर्याय
- Telegram : खऱ्या अर्थाने हा सर्वोत्तम पर्याय म्हणता येईल. बऱ्याच बाबतीत व्हॉट्सॲपपेक्षा चांगल्या सुविधा!
- Signal : ओपन सोर्स आणि सर्वात सुरक्षित मेसेजिंग ॲप. प्रायव्हसीसाठी सर्वोत्तम.
- Discord : प्रामुख्याने गेमिंगसंबंधित वापर पण अलीकडे नव्या सोयीमुळे सर्वांना वापरण्यासाठी चांगला पर्याय.
- Snapchat : आधीपासून लोकप्रिय पण भारतात तुलनेने कमी वापर
- Skype : ही मायक्रोसॉफ्ट सेवा व्हीडिओ कॉलिंग सारख्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे पुरवते
- यासोबत इतरही अनेक पर्याय आहेत.
Search Terms : WhatsApp updating privacy policy, what is whatsapp privacy policy whatsapp alternatives