एलजी या एकेकाळी स्मार्टफोन निर्मितीत आघाडीवर असणाऱ्या कंपनीने त्यांचा स्मार्टफोन निर्मिती विभाग बंद करणार असल्याचं जाहीर केलं आहे. गेले बरेच महीने त्यांच्या फोन्सना मिळणारा ग्राहकांचा प्रतिसाद कमी होत गेला आणि त्या कारणाने वाढत चाललेल्या तोट्यामुळे त्यांनी कंपनीची स्मार्टफोन निर्मिती पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर ते इलेक्ट्रिक वाहनांचे भाग, स्मार्ट होम उपकारणे, रोबॉट्स, AI, व्यवसायांसाठी साधने उपलब्ध करून देणाऱ्या सेवांवर लक्ष केंद्रित करणार आहेत.
काही वर्षांपूर्वी स्मार्टफोन विश्व गाजवणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या आता बाहेर पडल्या आहेत किंवा त्यांना दुसऱ्या कंपन्यांनी अधिग्रहीत केलं आहे. ब्लॅकबेरी, HTC, नोकिया, सोनी अशा कंपन्या अजूनही काही प्रमाणात फोन्स विकत असल्या तरी त्याची संख्या फारच कमी आहे. या सर्वच कंपन्यांना स्वस्त चीनी फोन्ससोबत स्पर्धा करणं शक्य झालं नाही. नव्या ग्राहकांच्या मागणीकडे पुरेसं लक्ष न दिल्यामुळेही असं झालेलं आहेच.
२०१३ मध्ये सॅमसंग व ॲपल नंतर एलजी जगातली तिसरी सर्वात मोठी फोन कंपनी होती. त्यानंतर गेली पाच सहा वर्ष त्यांचा हा विभाग तोट्यातच सुरू होता. परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करून पाहण्यात आले मात्र त्यांना काहीच यश मिळालं नाही. किंमती तुलनेने जास्त असल्यामुळे लोक चीनी फोन्सना प्राधान्य देत गेले आणि वरील कंपन्या मागे पडत गेल्या. गुणवत्तेने चांगले असलेले हे फोन्स आता यापुढे खरेदीसाठी उपलब्ध होणार नाहीत हे मात्र खरं.
आज आज आपण पाहत असलेल्या सर्व फोन्समध्ये मिळणाऱ्या वाइड अँगल लेन्सची सुरुवात एलजीनेच केली होती. गूगलच्या nexus मालिकेतील फोन्ससुद्धा एलजी तयार करत होती. अलीकडेच आलेला दोन स्क्रीन्स असलेला LG Wing सुद्धा भन्नाट होता. काही महिन्यात त्यांचा rollable स्क्रीन असलेला फोनही येणार होता मात्र आता त्याची शक्यता मावळली आहे.
अधिकृत माहिती : http://www.lgnewsroom.com/2021/04/lg-to-close-mobile-phone-business-worldwide