यूट्यूबने काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटनुसार त्यांनी डिसलाइक्स संख्या दिसणार नाही अशी चाचणी सुरू केली आहे. अलीकडे मोठ्या प्रमाणात ट्रोलर मंडळींकडून ऑनलाइन मोहिमा चालवून अमुक एखादा व्हिडिओ डिसलाइक करा असे प्रकार वाढीस लागले आहेत. भारतातसुद्धा असे प्रकार दिसून आले आहेतच. यावर उपाय म्हणून यूट्यूबवर डिसलाइकची संख्या दाखवणं बंद केलं तर त्याला कसा प्रतिसाद मिळेल याची चाचपणी यूट्यूबने करण्यास सुरुवात केली आहे.
अलीकडे यूट्यूबवर क्रिएटर्सना समोर ठेऊन अनेक बदल करण्यात येत आहेत. व्हिडिओ अपलोड केल्यावर त्यावर येऊ शकणाऱ्या कॉपीराइट स्ट्राइकची माहिती आधीच देणे, रियलटाइम सबस्क्रायबर काऊंट, इ. त्याअंतर्गत हा नवा बदल सुद्धा केला जाऊ शकतो. यानुसार यूट्यूब स्टुडिओमध्ये व्हिडिओ अपलोड करणाऱ्याला डिसलाइकची संख्या दिसेल मात्र व्हिडिओ पाहणाऱ्या viewers ना ती संख्या दिसणार नाही.
एखाद्या क्रिएटरसाठी त्याच्या व्हिडिओवर डिसलाईक्स येणं त्याचं मानसिक खच्चीकरण करणारी ठरू शकते. त्यात हे सर्व ट्रोलर्सनी कारण नसताना किंवा त्या व्हिडिओचा संबंध नसताना केलं की मग त्याचा आणखी त्रास होऊ शकतो.
मात्र या बदलाची दुसरी बाजू अशीसुद्धा आहे की एखादा व्हिडिओ खरोखरच वाईट असेल तर ते पाहणाऱ्या व्यक्तीला आधी समजणार नाही. त्यामुळे वाईट/फसव्या व्हिडिओच्या प्रसारातसुद्धा वाढ होऊ शकते. आधीच अनेक यूट्यूब चॅनल्स केवळ पैसा मिळवण्याच्या हेतूने खोट्या माहितीच्या/थंबनेलच्या आधारे व्हिडिओ पसरवत आहेत. त्यात जर डिसलाइक संख्या दिसत नसेल तर उगाच पाहणाऱ्याचा वेळ वाया जाणार आहे.
असा प्रयोग इंस्टाग्रामनेही केला आहे मात्र तिथे फोटो/व्हिडिओचा अंदाज आधीच येतो. यूट्यूबवर मात्र बऱ्यापैकी व्हिडिओ पाहिल्यावरच त्याचा कंटेंट चांगला की वाईट हे समजतं. त्यावेळी त्या व्हिडिओला असलेल्या डिसलाइक वरुन आपल्याला शक्यतो सहज समजतं की हा व्हिडिओ योग्य प्रकारे बनवलेला नाही.
याबद्दल अधिक माहिती https://support.google.com/youtube/thread/104325801?hl=en
सध्यातरी याची काही मर्यादित युजर्ससाठीच चाचणी सुरू असून येत्या काही महिन्यात यामधील प्रतिसाद पाहून पुढे हा बदल अंमलात आणला जाऊ शकतो.