सध्या आपण अनेक जण सोशल मीडिया वापरत असताना कधीतरी आपला किंवा आपण फॉलो करत असलेल्या व्यक्तीच्या अकाऊंटवर अपलोड केलेला फोटो कोणीतरी दुसराच व्यक्ती स्वतःच्या नावाने अपलोड करतो आणि वरून त्याचे क्रेडिट्स सुद्धा देत नाही असा प्रकार झालेला नक्की पाहिला असेल. फेसबुकने यावर उपाय म्हणून Rights Manager नावाची सोय सुरू करण्याच्या निर्णय घेतला आहे जी इमेज मॅचिंग तंत्रज्ञान वापरुन क्रिएटर्स आणि पब्लिशर्सच्या फोटोंची चोरी उघडकीस आणेल.
आता उपलब्ध असलेल्या टूल्सद्वारे आपण ऑडिओ, व्हिडिओ कॉपी करण्यात आला असेल तर तो काढून टाकण्याची मागणी करू शकता मात्र फोटोबाबत असं करता येत नव्हतं. आता या नव्या Rights Manager द्वारे तुम्ही तुमचा कॉपी केलेला फोटो काढून टाकण्यासाठी फेसबुककडे रिपोर्ट करू शकाल!
ही सोय सध्या काही ठराविक लोकांसाठीच मर्यादित असून जर तुम्हाला ही सोय हवी असेल तर तुम्ही फेसबुककडे apply करू शकता. याद्वारे तुमचा कंटेंट (Intellectual Property) प्रोटेक्ट करण्यासाठी फेसबुकला ॲप्लिकेशन द्यावं लागेल. राईट्स मॅनेजर फेसबुक व इंस्टाग्राम दोन्ही ठिकाणचा मॅचिंग कंटेंट शोधून देईल, त्यावर काय पावलं उचलायची याचं सेटिंग तुम्हाला करावं लागेल. इथे तुम्हाला तुमचा फोटो फेसबुक व इंस्टाग्रामवर कुठे कुठे सापडला आहे त्याची यादी दिली जाईल.
याअंतर्गत जर एखादी व्यक्ती वारंवार कॉपी करताना आढळली तर त्यांचं अकाऊंट काढून टाकण्यात येईल असंही फेसबुकच्या Repeat Infringer Policy मध्ये सांगण्यात आलं आहे.
सध्या ह्या टूलचा वापर किती प्रभावीपणे होईल ते सांगता येणार नाही पण यामुळे अनेक इनफ्लुएन्सर्स, पेज ॲडमिन्सची दुकानं बंद होऊ शकतील. मूळ फोटो काढणाऱ्या व्यक्तीच्या अकाऊंटवर १० लाइक आणि ५० फॉलोअर्स असताना हे असे कॉपी करून टाकत बसणारे लोक हजारो-लाखोंच्या संख्येत फॉलोअर्स व लाईक्स मिळवतात! काही पेजेस वा अकाऊंट्स तर केवळ रिपोस्टवरच सुरू आहेत! यामुळे मूळ अपलोड करणाऱ्या व्यक्तीवर अन्याय होतोच शिवाय त्याला त्याचं श्रेयसुद्धा मिळत नाही. इंटरनेटवर कंटेंटची चोरी ही मोठी समस्या आहे. एकीकडून उचलून दुसरीकडे टाक आणि फॉलोअर्स वाढव असा व्यवसाय सुरू झाला आहे. निदान आतातरी यामध्ये काहीसा बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा…
अधिक माहितीसाठी फेसबुकची अधिकृत पोस्ट वाचा : https://bit.ly/33Pc4Lp
Search Terms : Helping Creators and Publishers Manage Their Intellectual Property, image matching technology to help creators and publishers protect and manage their image content, how to copyright your images on instagram, how to stop people from stealing your content on facebook or instagram