रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Annual General Meeting) आज बऱ्याच गोष्टी जाहीर करण्यात आल्या असून यावेळी प्रथमच Reliance AGM व्हर्च्युअल ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आला आहे. या कार्यक्रमात Jio 5G, Jio TV+, Jio Glass, गूगलची जिओमधील गुंतवणूक यांबद्दल घोषणा करण्यात आली. नेहमीप्रमाणे शेयरहोल्डर्ससाठी वार्षिक अहवाल सुद्धा प्रदर्शित करण्यात आले ज्यानुसार रिलायन्स आता कर्जमुक्त कंपनी बनली असून अनेक क्षेत्रात भारतात प्रथम तर जगात आघाडीचं स्थान मिळवलं आहे!
भारत सरकारतर्फे स्पेक्ट्रम जाहीर होताच Jio 5G ची सेवा सुरू करण्यात येईल. जिओचं 5G नेटवर्क पूर्णतः भारतात तयार केलेलं असेल अशी माहिती देण्यात आली आहे. यासोबत 5G चे फायदे, यामुळे जिओ यूजर्सच्या वापरामध्ये येणारे बदल, त्यामागचं तंत्रज्ञान थोडक्यात सांगण्यात आलं.
जिओच्या 4G वेळेस घडून आलेल्या बदलांमुळे 5G बाबतही किंमती कमी ठेऊन नवा ग्राहकवर्ग मिळवणार हे साहजिक आहे. हे सुद्धा सर्वात स्वस्त 5G नेटवर्क असेलच असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यासोबत गूगलच्या गुंतवणुकीचीही माहिती रिलायन्स प्रमुख मुकेश अंबानी यांनी जाहीर केली. गूगल आता ३३७३७ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून याबदल्यात त्यांना जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ७.७ टक्के हिस्सा मिळेल. फेसबुक, सिल्व्हरलेक, विस्टा, जनरल अटलांटिक, केकेआर, TPG, कॅटरटन, इंटेल आणि qualcomm नंतर आता गूगलनेही जिओमध्ये गुंतवणूक केलेली आहे. याद्वारे जिओने तब्बल १.५२ लाख कोटी उभारले आहेत. पर्यायाने रिलायन्स आता कर्जमुक्त झाली आहे!
गूगल व जिओ मिळून लवकरच स्मार्टफोन व स्मार्ट फोन ओएससुद्धा तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत असंही यावेळी सांगण्यात आलं आहे!
तसेच यावेळी जिओ हेल्थक्लब द्वारे करण्यात येत असलेले प्रयत्न, जिओ मार्टद्वारे किराणा क्षेत्रातील प्रवेश याबद्दलही माहिती देण्यात आली असून जिओ मार्टच्या पहिल्या ऑर्डरसोबत COVID19 किट मोफत देण्यात देण्यात येणार आहे. किराणा दुकानदारांना ऑनलाइन आणण्यास जिओमार्टमार्फत पावले उचलली जातील.
इतर घोषणांची सविस्तर माहिती दुसऱ्या पोस्ट मध्ये देण्यात येईल