मागील काही वर्षांत इंटरनेटचा वेगवान प्रसार झाल्यामुळे या तंत्रज्ञानावर आधारित सेवांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यात ऑनलाइन खरेदी-विक्रीचा उद्योग मोठ्या प्रमाणात फोफावला. सध्या पुस्तक खरेदी, रेल्वे, विमानाच्या तिकिटांचे आरक्षण, कपडे खरेदी, मोबाइल, लॅपटॉप खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.
उत्पादनांची विस्तृत रेंज :
सध्या ऑनलाइन किराणामाल विक्री करणाऱ्या वेबसाइटचे प्रमाण वाढीला लागले आहे.
या वेबसाइटवर सध्या किराणामालापासून भाजी, फळे आदी खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रोजच्या रोज अपडेट होणारी उत्पादने आणि वेबसाइट ही या ऑनलाइन स्टोअरची वैशिष्ट्ये आहेत. साधा आणि सेंद्रिय भाजीपालाही येथे उपलब्ध करून देण्यात येतो. या शिवाय डाळी, तेल, तूप, दुधाशी संबंधित उत्पादने, बेकरी पदार्थही
येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. काही ऑनलाइन पोर्टलवर घरगुती गरजेच्या वस्तू, कन्फेक्शनरीज, मांस, शू पॉलिश आदीही उत्पादने येथे उपलब्ध आहेत. काही पोर्टलवर आयुर्वेदिक औषधांचीही विक्री करण्यात येते.
पेमेंटची पद्धत :
बहुतांश ऑनलाइन ग्रोसरी शॉपमध्ये नेटबँकिंग, क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून बिल चुकते करण्याची पद्धत आहे. या शिवाय ग्राहक गरजेनुसार ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चाही पर्याय निवडू शकतात. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये, आयटी उद्योगांमध्ये कार्यरत ग्राहकवर्ग त्यांना मिळणाऱ्या सोडेक्सो फूड कूपनच्या माध्यमातूनही बिल चुकते करतात. बहुतांश ऑनलाइन स्टोअरमध्ये सोडेक्सोची कूपन ग्राह्यही धरली जातात.
रिटर्न पॉलिसी :
ऑनलाइन ग्रोसरी शॉपमध्ये खरेदी करताना त्यांच्या होमपेजवर दर्शविण्यात आलेल्या उत्पादनांच्या छायाचित्रानुसार खरेदी करावी लागते. त्यामुळे ग्राहकांनी या वस्तू खरेदी करताना शॉपच्या ‘रिटर्न अँड रिफंड’ची धोरणे तपासून पाहण्याची गरज आहे. ग्राहकाने भाजीपाला, फळे किंवा बेकरी उत्पादनांची मागणी ऑनलाइन नोंदविल्यानंतर त्या वस्तू संबंधितांकडे घरपोच पोहोचविल्या जातात. डिलिव्हरीनंतर वस्तूंमध्ये दोष आढळल्यास बदलून देण्याची सोयही काही स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. अशावेळी ग्राहकाला संबंधित डिलिव्हरी बॉय अथवा स्टोअरतर्फे क्रेडिट नोट देण्यात येते. या क्रेडिट नोटच्या माध्यमातून
पुढील वेळी खरेदी करताना वस्तू बदलून मिळू शकते.
डिलिव्हरीची पद्धती :
ऑनलाइन स्टोअरमध्ये खरेदी केल्यानंतर शक्यतो त्याच दिवशी वस्तू ग्राहकाच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचविल्या जातात. होम डिलिव्हरीसाठी प्रत्येक शॉपने किमान खरेदीची रक्कम निर्धारित केली आहे. त्यानुसार तेवढ्या रकमेची ऑनलाइन खरेदी केल्यास हा फायदा मिळू शकतो.
ऑफरची खैरात :
घरातील कर्ता पुरुष अथवा स्त्री अथवा दोघेही कमावते असल्यास ऑनलाइन ग्रोसरी शॉपचा पर्याय चांगला ठरू शकतो. या शॉपमार्फत ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधाच नाहीतर, वेळोवेळी उत्तमोत्तम डिस्काउंट ऑफरही दिल्या जातात. त्यामुळे या ऑनलाइन ग्रोसरी पोर्टलवरून खरेदी केल्यास पैशांचीही बचत होऊ शकते. मात्र, कोणत्याही ऑनलाइन ग्रोसरी शॉपिंग पोर्टलवरून खरेदी करण्यापूर्वी कमी रकमेची एखादी ऑर्डर देऊन खात्री करणे, उत्तम.
(टीप : सद्य परिस्थितीत ही ऑनलाइन ग्रोसरी स्टोअर महानगरांमध्येच उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांनी ऑर्डर देण्यापूर्वी स्टोअरच्या वेबसाइटवर जाऊन खात्री करावी.)