गेली काही वर्षं स्वस्त झालेल्या इंटरनेटमुळे भारतात स्मार्टफोन्सवरून इंटरनेट वापरण्याच्या प्रमाणात अनेक पटीनं वाढ झाली. यापूर्वी कधीही इंटरनेटचा वापर न केलेली अनेक मंडळी यामुळे इंटरनेट द्वारे संवाद साधू लागली आहेत. आता गूगलकडून आलेल्या माहितीनुसार या नव्याने जोडल्या गेलेल्या इंटरनेट युजर्सपैकी ९०% लोक भारतीय भाषांमधील व्हिडिओ, गाणी, लेख पाहत आहेत!
काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती गूगल इंडियाच्या प्रॉडक्ट मॅनेजर निधी गुप्ता यांनी दिली. या माहितीनुसार हिंदी भाषा सर्वात पुढे असून २०१५-१६ दरम्यान हिंदीमधील कंटेंट पाहण्याचं प्रमाण ९० टक्क्यानी वाढलं तर इंग्लिशमधील केवळ १९ टक्क्यानी! अर्थात हिंदीच्या वापरामध्ये वाढ झाली असली तरी अजूनही गूगलच्या उत्पादनामध्ये इंग्लिशचा वापर सर्वाधिक केला जात आहे. ही गोष्ट नव्या इंटरनेट युजर्सबद्दल असून एकूण युजर्सबद्दल बोलल्यास तब्बल ९५% भारतीय इंटरनेट युजर्स भारतीय भाषांमध्ये व्हिडिओ पाहत आहेत!
विशेष म्हणजे इंटरनेटच्या वाढलेल्या वापराच्या आधी भारतीय भाषांमध्ये उपलब्ध सेवा फारच कमी प्रमाणात होत्या. आता यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. गूगलतर्फेसुद्धा यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले अशी माहिती देण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या जवळपास सर्वच सेवांमध्ये भारतीय भाषांचा समावेश केलेला आहे.
यूट्यूब, ट्विटर सारख्या माध्यमांवर ट्रेंड होणारे विषय लक्षात घेता भारतीय यूजर्सची भारतीय भाषेत कंटेंट पाहण्याची आवड दिसून येते. हिंदी बाजूला ठेऊन जरी विचार केला तरी मराठी, तमिळ, तेलुगू, बंगाली यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे हे वारंवार पाहण्यात आलं आहे!
गूगल न्यूज या सेवेमध्ये गूगलने काही महिन्यांपूर्वीच अधिक भारतीय भाषांचा समावेश केलेला असून हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ अशा दहापेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये आता ताज्या घडामोडी वाचता येतात! गेले काही महीने जसे की आपण पाहत आहोत गूगल असिस्टंट, Gboard, बोलो अॅप, गूगल लेन्स, गूगल अॅडसेन्स अशा प्रमुख सेवा मराठी भाषेत उपलब्ध झाल्या आहेत आणि यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा लाभत आहे!