बोसने अलीकडेच मोबाईल बाजारपेठेमध्ये दोन नवीन उत्पादने आणली आहेत. त्यात क्वाइटकम्फर्ट २० या हेडफोन्सचा आणि साऊंडलिंक या ब्लूटूथवर चालणाऱ्या मिनी स्पीकर्सचा समावेश आहे.क्वाइटकम्फर्ट २० (क्यूसी २०)छानपैकी गाणी आपण मोबाईलवर ऐकत असतो आणि त्याचवेळेस बाजूने एखादी ट्रेन धडधडत निघून जाते. तो ट्रेन निघून जाण्याचा काळ असा असतो की, आपल्याला हेडफोनमधील स्वर किंवा धून काहीच ऐकू येत नाही. असे होऊ नये आणि आजूबाजूला कितीही गोंगाट असला तरी आपण ऐकत असलेल्या बाबीची सुश्राव्यता जराही कमी होऊ नये यासाठी बोसने आता नॉइज कॅन्सेलेशन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे आजूबाजूचे येणारे आवाज हे तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत पोहोचते ते केवळ सुश्राव्य संगीतच. या संदर्भात माहिती देताना बोस इंडियाचे संचालक रतीश पांडे म्हणाले की, क्यूसी२० हे हेडफोन्स केव्हाही कुठेही सहज नेता येतील आणि वापरायला आवडतील, असेच आहेत. यामध्ये प्रत्येक इअर बडमध्ये दोन अतिलहान आकाराचे मायक्रोफोन्स वापरण्यात आले आहेत. त्यातील एक मायक्रोफोन बाहेरून येणारे आवाज समजून घेतो आणि ते रोखण्याचे काम करतो तर दुसरा आतमध्ये सुरू असलेल्या आवाजाची पातळी त्यानुसार राखून त्याची सुश्राव्यता कमी होऊ देत नाही. हेडफोनच्या कॉर्डमध्येच एक कंट्रोल मोडय़ुल बसविण्यात आलेले असून तिथे बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक चिपच्या माध्यमातून हे सारे नियंत्रित केले जाते. हे तंत्रज्ञान खास बोसनेच विकसित केलेले आहे. हे सारे काम या चिपमार्फत अवघ्या काही मिलिसेकंदांमध्ये होत असते. याचबरोबर पलीकडच्या बाजूस सुश्राव्यता वाढविणाऱ्या तंत्राचाही वापर केला जातो. यासाठी बोस ट्रायपोर्ट या बोसनेच विकसित केलेल्या आणखी एका खास तंत्राचा वापर करण्यात आला आहे. या क्यूसी२०मध्ये आणखी एक नवे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. अवेअर मोड असे त्याचे नाव आहे. हा मोड ऑन केल्यानंतर तुम्हाला क्यूसीमधून येणाऱ्या संगीताबरोबरच आजूबाजूला काय सुरू आहे, त्याचीही कल्पना येते. म्हणजे बाजूने एखादी गाडी हॉर्न वाजवत असेल किंवा मित्र गप्पा मारत असतील, तर तेही ऐकू येते. ट्रेन पकडताना होणारी उद्घोषणा ऐकण्यासाठी इअरप्लग काढून ठेवण्याची गरज नाही. अॅपलच्या उत्पादनांसाठी बोसने खास वेगळे क्यूसीआय विकसित केले आहेत.साऊंडलिंकसध्या आणखी एक महत्त्वाचा ट्रेंड पुढे आला आहे तो आहे टॅब्लेट किंवा स्मार्टफोनला मिनी स्पीकर जोडून त्यावर गाण्यांचा आनंद लुटण्याचा. मित्र- मैत्रीणी एकत्र आल्यानंतर मोबाईलमधील किंवा टॅब्लेटमधील स्पीकर्स पुरेसे पडत नाहीत. खूप आवाज वाढवला की, तो फाटतो त्यामुळे त्याच्या सुश्राव्यतेवर परिणाम होतो म्हणून हे मिनीस्पीकर्स वापरले जातात. आता बोसनेही असेच ब्लूटूथ तंत्रज्ञानावर चालणारे आणि सुश्राव्यता वाढविणारे साऊंडिलक हे मिनीस्पीकर बाजारात आणले आहेत. हे स्पीकर्स वजनाने अतिशय हलके म्हणजेच अवघे ६८० ग्रॅम्सचे आहेत. त्यामुळे ते कुठेही नेणे- आणणे सोपे आहे. त्याच्या बाह्य़रचनेसाठी अॅल्युमिनिअमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ते स्क्रॅ चप्रूफ आहेत. शिवाय ते विविध आकर्षक रंगसंगतीमध्येही उपलब्ध आहेत. अखेरच्या सहा पेअर केलेल्या उपकरणांची यादी त्याच्या मेमरीमध्ये राहाते त्यामुळे दरखेपेस पेअर करताना अडचणींना सामना करावा लागत नाही.भारतीय बाजारपेठेतील किंमत : क्यूसी २०- रु. २२,३८८/-साऊंडिलक : रु. १६,२००/-
काही दिवसांपूर्वीच अमर बोस यांचे निधन झाले असून ते BOSE sounds चे संस्थापक होते.