सोशल मीडियाचा वाढलेला प्रभाव त्याचबरोबर सहजरित्या व स्वस्तात उपलब्ध असणारे इंटरनेट यांमुळे अनेकांचा कल सोशल मीडियावरील न्युज वाचण्यात व पाहण्याकडे रूपांतरित होताना दिसत आहे. परंतु यामुळे याचे अनेक दुष्परिणामसुद्धा आपणासमोर येत आहेत. या लेखात आपण याबद्दल माहिती घेणार आहोत. सोबतच यापासून वाचण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावरही नजर टाकणार आहोत.
एखाद्या आर्टिकल/न्यूज पेजला किंवा व्हिडीओला मिळणाऱ्या व्हूजवरून तत्सम कंपनी/वेबसाइट/सोशल मीडिया पेज /चॅनलला आर्थिक उत्पन्न मिळत असल्याकारणाने आजकाल अनेकांचा ओढा खळबळजनक, फसव्या, कुतूहलात टाकणाऱ्या, सनसनाटी व्हिडिओज/पोस्ट/आर्टिकल्सद्वारे लोकांना आकर्षित करण्याकडे वाढला आहे. या कारणास्तव अनेकदा चांगला महत्वाचा कंटेंट आपणसमोर येत नाही. शिवाय हा कंटेंट मुख्यत्वे भावनात्मक असल्याकारणाने वस्तूनिष्ठ गोष्टींवरूनही फोकस कमी होताना दिसतो. अनेकांचा खूप वेळ अशामुळे वाया तर जातोच शिवाय त्याचे काही मानसिक व सामाजिक दुष्परिणामसुद्धा अनेकांना भोगावे लागत आहे.
सोशल मीडिया कंपन्यांचा प्रमुख उद्देश हा असतो की शक्य तितक्या वेळ वापरकर्त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ठेवणे किंवा वापरण्यास भाग पाडणे जेणेकरून याद्वारे त्यांना आर्थिक फायदा होईल. यासाठी अनेकदा ह्यूमन सायकलॉजी (मानवी मनाच्या) आणि त्याच्या कार्याच्या वैज्ञानिक अभ्यासाची मदत घेऊन त्यांचे डिझाईन व अल्गोरिदम (म्हणजेच ग्राहकांना पुढे कोणती पोस्ट/व्हिडीओ दाखवला जाईल याबद्दलचा प्रोग्रॅम) तयार केले जातात. हे अल्गोरिदम वापरकर्त्यांच्या पूर्वी पाहिलेल्या पोस्ट त्याचबरोबर लाईक्स, शेअरच्या मदतीने पुढील पोस्ट्स ठरवतात यामुळे अनेकदा खोट्या बातम्या, क्लिक-बेट (म्हणजे काय ते पुढे पाहुयातच..) वापरकर्त्यांसमोर येतात. याचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. यासाठी आपण एक उदाहरण पाहुयात…
समजा एखादा वापरकर्ता अमुक एक राजकीय पार्टी, व्यक्ती, विचाराचा समर्थक/विरोधक असल्यास त्याच्या न्यूज फीड किंवा यूट्यूब अकाऊंटवर त्याच पद्धतीचे पोस्ट दाखवले जातात जेणेकरून त्याकडून प्लॅटफॉर्मचा वापर होत राहावा. यांमुळे अनेकदा एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू समोर येत नाही, शिवाय फेक न्यूज, क्लिक-बेट वगैरेचा समावेश न्यूज फीड मध्ये वाढतो. या कारणास्तव अनेकदा सोशल मीडिया वरील न्यूज/ व्हिडीओज वरून अनेक गोष्टींबद्दल चुकीचे मत बनविले जाते. त्याचबरोबर याचा आणखी एक दुष्परिणाम असा की, एखाद्या गोष्टींबद्दलचे विरुद्ध मत समोर आल्यास वापरकर्त्यांमध्ये ती ऐकून घेण्याची मानसिकता कमी होताना दिसते.
क्लिक-बेट म्हणजे काय ?
अनेकदा फेसबूक/ट्वीटर न्यूज फीड, यूट्यूबवर आपणास पुढीलप्रमाणे पोस्ट/ व्हिडीओ दिसत असतीलच. ‘हे पाहून/वाचून आपणास आश्चर्य होईल..’, ‘यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत..’, ‘या आहेत 10 अमुक अमुक महत्वाच्या गोष्टी..’ वगेरे. या अशाप्रकारच्या फसव्या व कुतूहल वाढवणाऱ्या, सनसनाटी हेडलाइन्स द्वारे लोकांना क्लिक करण्यास भाग पाडले जाते आणि खरेतर यां व्हिडीओज, आर्टिकल्स किंवा बातम्यांमध्ये काहीही महत्वाची माहिती नसून लोकांना वेबसाइटवर घेऊन जाण्यासाठीचे प्रयत्न असतात. अशा फसव्या व कुतूहल जागवून लोकांना क्लिक करण्यास भाग पाडणाऱ्या बातम्या/पोस्टनाच क्लिक-बेट (Click-bait) म्हटले जाते.
क्लिक-बेट सारखे लेख वाचण्याची सवय अशा वापरकर्त्यांमध्ये वाढीस लागल्याने महत्वाचे लेख/संपादकीय पेजेस वाचने अशा वापरकर्त्यांना जड जाते. खरेतर हा आणखी एक मानसिक दृष्ट्या होत असणारा दुष्परिणाम आहे.
व्हॉट्सअॅपवर सुद्धा हल्ली खुपसाऱ्या बातम्या सत्यता न तपासताच शेअर केल्या जातात. याकारणास्तव फेक न्यूजचा प्रसार होण्यास मदतच होते. मागील वर्षी व्हॉट्सअॅपतर्फे याबद्दल जनजागृती मोहीम राबविण्यात आली होतीच.
वरील गोष्टींपासून वाचण्यासाठी आपण खालील उपाययोजना करू शकता
एखाद्या न्युज साईट किंवा सोशल मीडिया पेजवर सतत क्लिक-बेट, खळबळजनक व्हिडिओज पोस्ट केले जात असतील तर अशा पेजेसला अनफॉलो करणे. त्याचबरोबर वेबसाइटवरील न्यूज वाचण्याएवजी ई-पेपर, किंवा प्रिंट मीडियाला (न्यूज पेपर किंवा मॅगझिन्स ) प्राधान्य देणे. याचा आणखी एक फायदा असा की ऑनलाइन पेपर वाचण्याच्या तुलनेत आपण कमी वेळात खुपसारी माहिती मिळवू शकतो.(आपण स्वतः नक्कीच हा प्रयोग करून पाहू शकता!)
तुमच्या न्यूज फीड मध्ये असे पोस्ट दिसत असल्यास त्या पोस्टवर दिसणाऱ्या सेटिंग्ज (तीन डॉट्स आयकॉन) वर क्लिक करून आपण ‘Hide Post/ See Fewer Post Like This/ Unfollow Page’ असे पर्याय निवडू शकता. याचपद्धतीने आपण यूट्यूबवरील व्हिडीओ जवळ असणाऱ्या सेटिंग्जवर क्लिक करून ‘Not interested’ पर्याय वापरू शकता.
अफवा, खोट्या बातम्या पसरविणाऱ्या व्हॉट्सअॅ ग्रुपमधून बाहेर पडणे. तसेच अशा पद्धतीचे फॉरवर्ड करणाऱ्यांना ग्रुप मधून काढून टाकणे.फेसबुक, व्हाट्सअॅपसारख्या सोशल मीडियावरून ज्या गोष्टी पोस्ट/सेंड केल्या जातात त्यामध्ये बर्यापैकी असत्य गोष्टी जास्त असतात.अफवा, खोट्या बातम्यांमुळे लोकांच्या भावना भडकावल्या जाऊन गैर-प्रकार आणखी वाढतात.
खरेतर वरील अनेकसाऱ्या गोष्टींमध्ये वापरकर्त्यांपेक्षा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जास्त कारणीभूत असूनही (याचे प्रमुख कारण ह्यूमन सायकलॉजीचा आर्थिक फायद्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सकडून केला गेलेला वापर) याचे दुष्परिणाम हल्ली सामान्य नागरिक तसेच समाजावर दिसून येत आहेत. आमचा अनुरोध आहे की आपण या गोष्टींचा नक्कीच विचार करावा आणि दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना अमलात आणाव्यात.
त्यासोबतच अकाऊंट सुरक्षेबद्दल अधिक माहितीसाठी आमचा लेख : आपले ऑनलाइन अकाऊंट (फेसबुक,जीमेल, ट्वीटर) सुरक्षित कसे ठेवायचे ? त्याचबरोबर अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याएवजी पासवर्ड मॅनेजरचा वापर करून फक्त एकाच पासवर्डद्वारे सर्व अकाऊंट कसे वापरायचे याबद्दल माहितीसाठी : पासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…?!?!
आजकाल आश्या खोट्या अॅडस, बातम्या खुप लवकर प्रसिध्द होतात आणि ज्यांना मोबाईल वापर जास्त कळत नाही ते आश्या गोष्टीला बळी पडतात. आपण सुचवलेले उपाय खरच फायद्यचे ठरतील. धन्यवाद सर