अॅपल आयफोन ४ हा ८ जीबीचा स्मार्टफोन भारतात नव्याने लाँच करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन केवळ १५,००० रु. उपलब्ध होणार आहे. मागील काही महिन्यांमध्ये सॅमसंगची भारतीय बाजारपेठेतील चलती यामुळे अॅपलला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे अॅपलने हा निर्णय घेतल्याचे समजते. तसेच भारतीय शेअर बाजारातही आपला भाव वधारावा यासाठी अॅपलचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत.
अॅपलच्या चार भागीदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, २६,५०० रु. किंमतीचा आयफोन ४ हा १५,००० रु. ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. आयफोन ४ हा तीन वर्षापूर्वी लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आयफोन ४एस, ५, ५सी आणि ५एस वर्जन पर्यंत फोन लाँच करण्यात आले आहेत. आयफोनच्या सध्याचा नवीन आणि अपडेट ५एस या स्मार्टफोनची किंमत ५३,५०० पासून सुरु होते.
का थांबवलं होतं आयफोन ४चं उत्पादन?
कंपनीच्या लेटेस्ट फोनची विक्रीत वाढ व्हावी साठी मागील काही महिन्यापासून आयफोन ४ ची विक्री बंद करण्यात आली होती. मात्र यामुळे कंपनीला म्हणावा तसा फायदा झाला नाही. आयफोन ४ हा टॉप तीन मॉडेल पैकी होता. जो सॅमसंगला टक्कर देत होता. मात्र याचे उत्पादन थांबविण्यात आल्याने अॅपलला भारतीय बाजारपेठेत चांगला फटका बसला आहे.
आयफोनची ४ ची भारतीयांना आजही भुरळ
अॅपलने मागील ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आयफोन ४ चे उत्पादन बंद केले आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनाच्या एका उच्च अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आकर्षक किंमतींमुळे भारतात आता आयफोन ४ ची मागणी वाढत आहे. मात्र इतर बाजारात हवी तशी मागणी नसल्याने याचे उत्पादन सुरु केले जाईल की नाही याबाबत अजूनही शाशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT