कालपासून जर तुम्ही इंस्टाग्राम, ट्विटर सोशल मीडिया ट्रेंडस पाहिले तर अचानक बरेच जण त्यांचे वृद्ध झाल्यावर कसे दिसतील हे दर्शवणारे फोटो शेयर केलेले पाहायला मिळतील! अचानक सुरू झालेला हा ट्रेंड FaceApp नावाच्या २०१७ मध्येच उपलब्ध झालेल्या अॅपची कमाल आहे! हे अॅप तुम्ही आपलोड केलेल्या फोटोचा कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) द्वारे अभ्यास करून तुमचा चेहरा तरुण असताना किंवा वृद्ध झाल्यावर कशा प्रकारे दिसेल हे दाखवतो. उत्कृष्ट प्रकारचे फिल्टर्स वापरलेले असल्यामुळे बऱ्यापैकी चांगला रिजल्ट पाहायला मिळतो!
फेसअॅप हे रशियन डेव्हलपर्सनी तयार केलेलं अॅप असून यामध्ये न्यूरल नेटवर्क्सचा वापर करून चेहऱ्यावर विविध फिल्टर्स लावता येतात. यामध्ये आणखी काही सुविधासुद्धा उपलब्ध आहेत जसे की एखाद्या फोटोमध्ये व्यक्ती हसलेली नसेल तर तिथे हास्य जोडता येतं, वृद्ध असाल तर तरुण दिसण्याचा फिल्टर, तरुण असाल तर वृद्ध झाल्यावर कसे दिसू शकाल हे दाखवणारा फिल्टर, चेहऱ्याची स्टाइल बदलणारा फिल्टर.
सध्या अनेक यूजर्स याचा वापर करून सोशल मीडियावर स्टोरीद्वारे शेयर करत आहेत. अनेक सेलेब्रिटींनीसुद्धा स्वतःचे वृद्ध झाल्यावरचे रूप दाखवणारे फोटो शेयर केले आहेत. त्यात भर म्हणजे हे अॅप खरंच चांगल्या प्रकारे फिल्टर अप्लाय करत असून त्यामुळेच याची लोकप्रियता आणखी वाढली आहे. काल तर ट्विटरवर चक्क अनेक तास #FaceApp ट्रेंडिंग होतं! काही वेबसाइट्स मात्र या अॅपद्वारे प्रायव्हसीची व्यवस्थित काळजी घेत नसल्याच सांगितलं आहे. प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काही विशिष्ट गोष्टी स्पष्ट नसल्यामुळे युजर्सच्या फोटोची माहिती वापरण्याचा हक्क फेसअॅप घेऊन ठेवत आहे. त्यामुळे शक्यतो अगदीच वैयक्तिक/खासगी फोटो यावर शक्यतो अपलोड करू नका.
हे अॅप iOS व अँड्रॉइड दोन्हीवर उपलब्ध आहे. मात्र हे अॅप पूर्णपणे मोफत नाही. पहिल्या तीन मोफत दिवसानंतर या अॅपची पैसे देऊन नोंदणी करावी लागते.
Download FaceApp on Google Play
Download FaceApp on App Store