गेले काही दिवस तुम्ही मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सोशल मीडिया पेजेसवर लक्ष ठेवून असाल तर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० बद्दल अचानकच पोस्ट्स सुरू झालेल्या पाहायला मिळाल्या असतील. अनेकांना याचा अर्थ उमगत नव्हता. मात्र काल मायक्रोसॉफ्टने नेटफ्लिक्सवरच्या प्रसिद्ध स्ट्रेंजर थिंग्ज या मालिकेच्या तिसऱ्या सीझनच्या निमित्ताने हे केल्याचं उघड झालं आहे. यासाठी मायक्रोसॉफ्टने स्ट्रेंजर थिंग्जसोबत भागीदारी करून विंडोज १.१ अॅप सादर केलं आहे ज्यामध्ये आधीच्या विंडोजमधील डिझाईन लूक देण्यात आला आहे! यासाठी विंडोजच्या सोशल मीडिया पेजेसवर त्यांचा लोगोसुद्धा बदलण्यात आला आहे! हे अॅप त्या मालिकेप्रमाणे १९८५ च्या उन्हाळ्यातला कालावधी दाखवत असलं तरी प्रत्यक्षात Windows 1.0 नोव्हेंबर १९८५ मध्ये उपलब्ध झालं होतं!
अधिकृत लिंक : microsoft.com/en-us/windows/strangerthings3
या अॅपमध्ये Windows 1.0 च्या फारश्या सुविधा उपलब्ध नसून मुख्य उद्देश स्ट्रेंजर थिंग्जच्या कथानकानुसार मधून अधून पाहायला मिळणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकाल. जर तुम्ही नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्ज पाहिली नसेल तर नक्की पहा आणि मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजेल/आवडेल.
स्ट्रेंजर थिंग्ज पाहिली असेल तर त्यामध्ये कोणीही विंडोज पीसी वापरताना दिसत नाही मात्र डस्टिन (मालिकेतलं पात्र) Camp Know More लिहिलेली टोपी घालताना पाहायला मिळतो. ही कॅम्प नो मोर मुख्य भागीदारीचं कारण असून याद्वारे मायक्रोसॉफ्टच्या दुकानांमध्ये विद्यार्थ्याना विविध चॅलेंजेसमध्ये भाग घेत कोडिंग करत गेम्स खेळता येतील. सोबत त्यांच्या मिक्स्ड रियालिटी हेडसेट्सद्वारे 3D Models सुद्धा तयार करून पाहता येतील!