काल गूगलच्या क्लाऊड सेवांचा वापर करणार्या जवळपास सर्वच प्रमुख वेबसाइट्स काही काळासाठी काम करत नव्हत्या. गूगल क्लाऊड सेवांमध्ये काही अडचणी निर्माण झाल्यामुळे यूट्यूब, जीमेलसारख्या गूगलच्या सेवांसोबत डिस्कॉर्ड, स्नॅपचॅट या गूगलच्या क्लाऊड सेवा वापरणार्या अॅप्स व वेबसाइट्ससुद्धा बंद झाल्या होत्या. प्रामुख्याने अमेरिका व युरोप भागामध्ये अनेकांना या वेबसाइट्स पाहण्यामध्ये अडचणी येत होत्या. गूगलची स्मार्ट होम सेवा पुरवणारी नेस्टसुद्धा यामध्ये सापडली आणि अनेकांना त्यांच्या घरातील नेस्ट आधारित स्मार्ट उपकरणे वापरता येत नव्हती!
गूगलच्या अधिकृत माहितीनुसार मोठ्या नेटवर्क अडचणीमुळे हा प्रकार घडला असल्याच तूर्तास सांगण्यात आलं आहे. मोठ्या कंपन्याच्या सेवांना अशा अडचणी फार काळ राहत नसल्या तरी अलीकडे यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे हे नक्की. गेल्या काही महिन्यात गूगलच्याच बाबतीत अनेक वेळा झाली आहे. कधी यूट्यूब तर कधी सर्वच सेवा बंद पडण्याचे प्रकार पाहायला मिळाले आहेत.
आता हा लेख लिहीत असताना या सर्व सेवा पूर्वरत झाल्याचं गूगलतर्फे जाहीर करण्यात आलं आहे. याबद्दल अधिक माहिती अभ्यास करून जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.
मात्र अशा वारंवार घडणार्या घटनांमुळे क्लाऊड सेवांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून गूगलसारख्या क्लाऊड सेवा पुरवणार्या एकाच कंपनीवर एकाच वेळी अनेक जन अवलंबून असतील आणि त्यांचीच सेवा अशी बंद पडत असेल तर मोठं नुकसान होऊ शकतं.