इंस्टाग्रामने काही महिन्यांपूर्वी उपलब्ध करून दिलेल्या IGTV अॅपमध्ये आता उभ्या व्हिडिओजसोबत आडवे (Landscape Format) व्हिडिओ पाहण्याची सोय दिली आहे! इंस्टाग्रामवरील असलेली कमी वेळेची मर्यादा IGTV अॅपद्वारे दूर करून थेट यूट्यूबसोबत स्पर्धा सुरू केली होती. सुरूवातीला स्वतंत्र अॅपला मिळणारा कमी प्रतिसाद पाहून आता इंस्टाग्रामवरच हे IGTV व्हिडिओ पाहण्यास उपलब्ध करून दिले जात आहेत.
IGTV या खास व्हिडिओ शेअरींगसाठी असलेलल्या प्लॅटफॉर्मवर आडव्या व्हिडिओची मागणी अनेक दिवसांपासून होती. ती आता Vertical सोबत Landscape व्हिडिओ पाहण्याची सोय उपलब्ध करून देत पूर्ण केली आहे. यामुळे क्रिएटर्सना एकाच व्हिडिओमध्ये जास्त माहिती/दृश्य दाखवता येईल आणि पाहणार्या यूजर्सनासुद्धा पाहणं सोपं होईल. या सोयीमुळे IGTV ची यूट्यूबसोबत खरी स्पर्धा सुरू झाली म्हणायला हवं…
इंस्टाग्रामने या बदलाची तुलना २०१५ मध्ये केवळ चौरस (Square) आकाराचाच फोटो अपलोड करण्याचं बंधन दूर करून कोणत्याही आकारात अपलोड करता येईल अशी सोय केली होती त्यासोबत केली आहे. सुरूवातीला आलेल्या माहितीनुसार बर्याच क्रिएटर्सना उभे व्हिडिओ व त्यांना मिळणारा कमी प्रतिसाद अडचणीचा ठरत असल्याचं समजल्यावर हे पाऊल उचललेलं दिसत आहे. सध्यातरी हे लँडस्केप व्हिडिओ मुख्य इंस्टाग्रामवर उभ्या आकारातच दिसतील मात्र इंस्टाग्रामवरसुद्धा IGTV लँडस्केप व्हिडिओ पाहण्याचा पर्याय आणला जाऊ शकतो…!