अलीकडच्या काळात फोन्समध्ये एक्सटर्नल मेमरी कार्ड देण्याचं कमी झालेलं प्रमाण पाहून microSD कार्डस आता संपुष्टात येणार असं वाटत असतानाच पुन्हा मोठ्या फ्लॅगशिप फोन्समध्ये एक्सटर्नल स्टोरेजची सोय देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मायक्रॉन व सॅनडिस्क (आता WD कडे) यांनी एक टेराबाइट (1TB) म्हणजे 1024GB स्टोरेज असलेले मेमरी कार्डस जाहीर केले आहेत!
आजवर जास्तीतजास्त 512GB पर्यंतचं मेमरी कार्ड उपलब्ध होतं. अलीकडच्या काही फोन्सना त्यानुसार पर्यायसुद्धा देण्यात आले होते. मात्र दिवसेंदिवस वाढत जाणारा फाइल्सचा आकार आता अधिक स्टोरेजची गरज जाणवून देत आहे. मोठ्या व्हिडिओ फाइल्स, एचडी इमेजेस यांना आता अधिक जागा लागेल त्यानुसार फोन्समध्ये अधिक स्टोरेजसाठी अधिक मोठं मेमरी कार्ड आलंच…
मायक्रॉन कंपनीने C200 1TB microSDXC UHS-I कार्ड जाहीर केलं असून यामध्ये त्यांची 96-layer 3D quad-level cell (QLC) NAND तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. या कार्डमध्ये A2 App Performance Class specification चा समावेश असून यामुळे Android Adoptable Storage द्वारे अॅप्स आणि गेम्स कार्डवर इंस्टॉल करून वेगात वापरता येतील!
Micron C200 1TB microSD कार्डचा वेग 100MB/s read व 95MB/s write असा आहे. 4K video recording आणि burst mode फोटो अगदी सहज काढता आणि स्टोर करता येतील. याची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.
यासोबतच वेस्टर्न डिजिटल (Western Digital WD) ने सुद्धा स्वतः चं 1TB UHS-I microSD कार्ड 1TB SanDisk Extreme UHS-I microSDXCकार्डच्या रूपात सादर केलं आहे. हे कार्ड मायक्रॉनच्या कार्डपेक्षा अधिक वेगवान असून 160MB/s read या वेगाने काम करू शकेल. हे WD करू शकली याच कारण त्यांचं स्वतःचं फ्लॅश तंत्रज्ञान. या कार्डची किंमत $449.99 (~₹ ३२०००) अशी असून एप्रिल २०१९ मध्ये उपलब्ध होतील.