गूगलचा सर्वात लोकप्रिय ब्राऊजर गूगल क्रोम आज दहा वर्षांचा होत आहे आणि त्यानिमित्त गूगलने बऱ्याच वर्षांनंतर आज क्रोमच्या यूजर इंटरफेस डिझाईनमध्ये बदल केला आहे! त्यांच्या प्रसिद्ध मटेरियल डिझाईन आधारीत पर्याय आता क्रोमवर उपलब्ध असतील! २ सप्टेंबर २००८ रोजी क्रोम ब्राऊजर विंडोज एक्सपीसाठी प्रथम उपलब्ध झाला होता.
काही वर्षांपूर्वी अगदी तळाशी असलेला गूगलचा हा ब्राऊजर त्या काळच्या सर्वांना मागे टाकत सध्या जगातला सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राऊजर आहे! इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स, सफारी, ऑपेरा, एज या सर्वांना एकत्रित जरी धरलं तरीही क्रोमच्या एकूण वापरकर्त्यांच्या संख्येपेक्षा कमीच वापरकर्ते आहेत! डेस्कटॉप कॉम्पुटर्सवर ६५% आणि फोन्सवर ६०% हिस्सा आज एकट्या क्रोम ब्राऊजरकडे आहे! या यशाचं मुख्य कारण म्हणजे वेबसाइट उघडण्यास बऱ्याच प्रमाणात कमी वेळ घेणं आणि सोपं सुटसुटीत डिझाईन.
नव्या अपडेटमध्ये बऱ्याच गोष्टी अधिक वेगवान होणार असून यामुळे एकंदर अनुभवात मोठा फरक पडेल असं गूगलकडून सांगण्यात येत आहे! नव्या लूकमध्ये टॅबचा आकार बदलला असून यामुळे अनेक टॅब्स उघडल्या असतील तर आयकॉन पाहून स्विच करणं सहज जमेल! असे बदल अँड्रॉइड व iOS वर सुद्धा पाहायला मिळतील! यासाठी क्रोम अपडेट करून घ्यावं लागेल…
- डेस्कटॉप/लॅपटॉप : उजव्या कोपऱ्यात तीन डॉट असलेला पर्याय > Help > About Chrome
- अँड्रॉइड स्मार्टफोन : प्ले स्टोरमध्ये Updates > Google Chrome > Update
- आयफोन : अॅप स्टोरमधून गूगल क्रोम अपडेट करा.
आता क्रोममधील ऑटो फील (AutoFill) अधिक उत्तमरीत्या काम करेल ज्यामुळे पासवर्ड्स, पत्ते, क्रेडिट/डेबिट कार्ड्सची माहिती साठवून गरजेनुसार वापरणं सोपं झालं आहे.
- क्रोम आता नव्या पासवर्ड जनरेटरद्वारे स्वतः सुरक्षित पासवर्ड्स तयार करेल जे तुम्ही विविध साईट्सवर वेगवेगळे वापरून तुमची ऑनलाईन अकाउंट्स सुरक्षित करू शकता!
क्रोमचा सर्चबार सुद्धा आता स्मार्ट झाला असून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला या बारमध्येच मिळून जातील! उदा. गणितं, व्याख्या, हवामान, भाषांतर यांची माहिती सर्च बारवरच मिळेल! तसेच तुम्ही २० टॅब्स उघडल्या असतील आणि नेमकी टॅब सापडत नसेल तर सर्च बारमध्येच स्विच टॅब द्वारे योग्य ती टॅब सुचवली जाईल!
- क्रोमच्या होमपेज/स्टार्टपेजवर स्वतःची बॅकग्राऊंड इमेज सेट करता येईल! उजव्या कोपऱ्यात खाली नवा पर्याय ज्याद्वारे आपल्या कॉम्पुटरमधील हवी ती इमेज अपलोड करून आपण क्रोमची बॅकग्राऊंड म्हणून वापरू शकतो!
Fun Fact : मराठीटेकवरील सर्वात पहिली पोस्ट गूगल क्रोमबद्दलच होती!