काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टने ॲपलला दोन वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच मागे टाकत जगातील सर्वाधिक भागभांडवल असलेली कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे. हा लेख लिहीत असताना मायक्रोसॉफ्टचं मार्केट कॅपिटल 2.901 ट्रिलियन डॉलर्स झालं असून ॲपलचं मार्केट कॅप 2.839 ट्रिलियन डॉलर्सवर घसरलं आहे. २०२१ नंतर प्रथमच मायक्रोसॉफ्टने ॲपलला मागे टाकण्यात यश मिळवलं आहे!
मायक्रोसॉफ्टने OpenAI चे तंत्रज्ञान त्याच्या सॉफ्टवेअर्समध्ये समाविष्ट करण्यास सुरुवात केली असून आता CoPilot Pro द्वारे त्यांनी त्यामधील सर्व सोयी त्यांच्या बिझनेस सॉफ्टवेयरमध्येही दिल्या आहेत यामुळेच क्लाउड-कॉम्प्युटिंग व्यवसायात सुधारणा घडवून आणण्यास मदत झाली आणि त्यांचं त्यामधून मिळणारं उत्पन्न आणखी वाढलं आहे. AI मधील आघाडीमुळं वेब सर्चवरील गूगलच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची संधी देखील निर्माण केली आहे.
सत्या नाडेला यांच्या नेतृत्वात मायक्रोसॉफ्टला खऱ्या अर्थाने गतवैभव मिळालं आहे असं म्हणता येईल. क्लाऊड संबंधित सेवांवरच लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि AI बाबतीत वेळीच पावले उचलल्यामुळे मायक्रोसॉफ्टला हा टप्पा गाठता आला आहे.
ॲपलच्या Vision Pro Mixed Reality हेडसेटची विक्री अमेरिकेत २ फेब्रुवारीपासून सुरू होईल, २००७ मधील आयफोन लॉंचनंतर ॲपलचे सर्वात मोठे उत्पादन लाँच म्हणता येईल. ॲपल 3 ट्रिलियन डॉलर्सचं भागभांडवल गाठणारी जगातली पहिली कंपनी ठरली होती आता या नव्या उत्पादनाला ग्राहकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पुन्हा ॲपल पहिल्या स्थानी जाईल की नाही ते कळेलच.
जगात सर्वात जास्त मार्केट कॅप असलेल्या कंपन्या
- मायक्रोसॉफ्ट : 2.901 ट्रिलियन डॉलर्स
- ॲपल : 2.839 ट्रिलियन डॉलर्स
- अल्फाबेट (गूगल) : 1.793 ट्रिलियन डॉलर्स
- ॲमेझॉन : 1.583 ट्रिलियन डॉलर्स
- Nvidia : 1.393 ट्रिलियन डॉलर्स