तुम्ही गेल्या काही दिवसात जर बातम्या पाहत असाल तर CCH Cloud Miner संबंधीत सोलापूर, धुळे अशा शहरामध्ये घडलेल्या घटना वाचल्या असतील. यामध्ये अनेक लोकांनी कमी काळात पैसे दुप्पट होतील ह्या आशेनं हजारो-लाखो रुपये गुंतवले आणि आता या ॲपमधून पैसे काढण्याचा पर्याय बंद झाला आहे. त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
CCH Cloud Miner नावाच्या ॲपमध्ये पैसे गुंतवल्यास ते दरदिवशी रकमेत थोडी थोडी वाढ होत जाऊन काही दिवसातच दामदुप्पट व्हायची. एबीपी माझावर मिळालेल्या माहितीनुसार सीसीएच स्किम डेली रिटर्नवर जास्त चालते. ॲपवर अनेक योजना आहेत. CCH मध्ये नोंदणी करताना 1090 USDT ची (जवळपास ९०००० रुपये) गुंतवणूक केली जाते.
USDT म्हणजे Tether या बिटकॉईन(BTC), एथीरियम (ETH) अशा आभासी चलनाप्रमाणे एक चलन (Cryptocurrency) आहे जे टेथर कंपनीने आणलं होतं. याची किंमत १ अमेरिकन डॉलर ला एक USDT अशीच ठेवण्यात आली आहे म्हणजे डॉलरसोबतच याचीही किंमत वरखाली होते. मात्र USDT म्हणजे USD नाही. USD हे अमेरिकेचं अधिकृत चलन आहे.
या ९० हजारांच्या गुंतवणुकीवर ३५ दिवस दररोज ७ हजार ४१२ रुपये मिळायचे. म्हणजे ३५ दिवसात २ लाख ५९ हजार रुपये या ॲपच्या खात्यात जमा व्हायचे. अनेकांच्या म्हणण्यानुसार बरेच दिवस ते पैसे जमासुद्धा व्हायचे आणि काढून सुद्धा घेता येत होते आणि नेमका यामुळेच पुढील गैरप्रकार घडला आहे. काही जणांना पैसे मिळालेले पाहून त्यांनी इतरांना Refer करण्यास सुरुवात केली त्यातून इतरांनीही पैसे गुंतवले. काही जणांनी तर घरीसुद्धा कल्पना न देता मोठी रक्कम यामध्ये गुंतवली आहे. आता या ॲप Withdraw म्हणजे पैसे काढून घेण्याचा पर्याय दिसत नाही. त्यामुळे हे सर्व पैसे वायाच गेले असं गृहीत धरावं लागेल. कोट्यवधी रुपये घेऊन हे ॲप डेव्हलपर आता पळून गेले आहेत.
हे सर्व करण्यापूर्वी या ॲपची सत्यता पडताळण्याच काम एकानेही केलेलं दिसत नाही. या ॲपच्या पेजवर गेल्यास त्यांची वेबसाइटसुद्धा नाही हे दिसून येतं. काही जण cchcloudminer.com वरूनही व्यवहार करायचे असं यूट्यूबवर दिसून आलं आहे. ही वेबसाइटसुद्धा आता बंद आहे. ॲपचा डेव्हलपर म्हणून Destini L Thiel असं नाव आहे! त्यांनी वापरलेला ईमेल हा ProtonMail वरील असून हा encrypted मेल सर्व्हिस देणारी सेवा वापरतो त्यामुळे ते ईमेल अकाऊंटसुद्धा ट्रॅक करणं कुणाला शक्य नाही. याचं Description सुद्धा मोजून ४-६ ओळीचं आहे. नाव गाव पत्ता काही समोर नसताना एव्हढया सगळ्या स्पष्टपणे स्कॅम (घोटाळा) होऊ शकतो हे दिसत असताना केवळ कमी काळात पैसे दामदुप्पट होण्याच्या उद्देशाने या लोकांनी पैसे गुंतवून टाकले. यातल्या कुणालाही crypto म्हणजे काय त्याचे व्यवहार कसे होतात वगैरे काहीही माहिती नाही.
यामध्ये refer करणारे Agent आता काही पळून गेले तर काही जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हे ॲप अजूनही गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तिथल्या माहितीनुसार हे ॲप एक लाखाहून अधिक लोकानी डाउनलोड केलेलं आहे. पोलिस स्टेशनमध्ये सध्या ३१ जणांनीच जरी तक्रार दिली असली तरी प्रत्यक्षात पैसे गुंतवलेल्याची संख्या नक्कीच मोठी असणार आहे. बऱ्याच शहाण्या लोकांनी तर वस्तु गहाण ठेवून यामध्ये पैसे गुंतवले आहेत. आता यावर परत telegram, whatsapp वर मेसेज पाठवून यामधील पैसे काढून देतो अशा अर्थाचे मेसेज पाठवून पुन्हा एकदा फसवण्याचे प्रकार करत आहेत.
मी स्वतः सोलापूरमधून असल्यामुळे गेल्या काही दिवसात याबद्दल बऱ्याच बातम्या, सोशल मीडियावर पोस्ट दिसत आहेत. सोलापूर, धुळे अशा महाराष्ट्रातील शहरांसोबत छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली अशा इतरही राज्यातल्या लोकांची फसवणूक झाली आहे.
मराठीटेकतर्फे आमचं आवाहन आहे की यापुढे तुम्हाला कितीही आकर्षक वाटेल अशी ऑफर, जाहिरात दिसली तरी पूर्ण तपासणी केल्याशिवाय Rummy Apps, Instant Loan Apps, Crypto Mining Apps, Chain Marketing Apps डाउनलोड करू नका. त्यामध्ये स्वतःचे किंवा इतरांचे पैसे गुंतवू नका. भले ते तुम्ही रोज पाहत असलेल्या सेलेब्रिटीनी त्याची जाहिरात केली असली तरी ते अजिबात डाउनलोड करू नका. कमी काळात काहीही न करता पैसे मिळवून देणे हे जगात कुणालाही शक्य नाही. कधीही अशा आमिषाना बळी पडू नका.