इंस्टाग्रामवर काही वर्षांपूर्वी म्हणजे फेसबुकने इंस्टाग्रामवर विकत घेण्याच्या आधी या प्रसिद्ध सोशल मीडिया ॲपवर आपण फॉलो करणाऱ्याचे सर्व फोटोज कधी अपलोड करण्यात आले आहेत त्यानुसार पाहण्याचा पर्याय उपलब्ध होता. Chronological Feed म्हणजे अशी फीड ज्यामध्ये सर्वात अलीकडे अपलोड करण्यात आलेली पोस्ट सर्वात वर दिसते आणि बाकीच्या त्यानुसात क्रमाने दिसत जातात.आता हा पर्याय थोडासा बदल करून इंस्टाग्रामवर पुन्हा आला आहे!
Chronological Feed काढून इंस्टाग्रामने त्यांच्या अल्गॉरिथ्म आधारित पोस्ट्स दाखवण्यास सुरुवात केली होती ज्यामध्ये आपल्याला आवडू शकेल किंवा आपण ज्याप्रकरचा कंटेंट पाहत आहोत असाच कंटेंट आपल्यापुढे ठेवला जात आहे. हा बदल केल्यापासून बऱ्याच युजर्सकडून आजतागायत यावर टीका केली जात होती. कारण यामुळे मूळ इंस्टाग्रामचं एक आवडणारं फीचर निघून गेलं होतं. यामुळे दिसणारा कंटेंट बऱ्याच वेळा असा असतो की जो आपल्याला पाहण्याची फारशी इच्छा नसते पण तो आपल्यावर बघाच म्हणून लादला जातोय. शिवाय त्यानुसार जाहिराती तर आहेतच…अनेक आवडीच्या ॲक्टिव्ह अकाऊंट्सचे फोटो फॉलो करत असूनही कधीच दिसत नाहीत.
आता मात्र वाढत्या स्पर्धेमुळे आणि मागणीमुळे हा पर्याय पुन्हा एकदा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये इंस्टाग्रामवर Favorites आणि Following असे दोन पर्याय आता दिसतील. डाव्या कोपऱ्यात इंस्टाग्राम लोगोवर टॅप केल्यास हे दोन पर्याय दिसतील.
Following : आपण फॉलो करत असलेल्या अकाऊंट्सचे सर्वात अलीकडे अपलोड करण्यात आलेले फोटोज यामध्ये दिसतील.
Favorites : आपल्या आवडीच्या अकाऊंट्सच्या लेटेस्ट पोस्ट्स पाहण्यासाठी हा पर्याय देण्यात आला आहे ज्यामध्ये आपण निवडलेल्याच अकाऊंट्सच्या पोस्ट्स ज्या प्रमाणे पोस्ट करण्यात आल्या आहेत तशा दिसतील.
Main Feed : ही मुख्य फीड जी आपण सध्या ॲप उघडल्या उघडल्या दिसते. यामध्ये इंस्टाग्राम त्यांच्या अल्गॉरिथ्म प्रमाणे पोस्ट्स दाखवेल जय एक दोन दिवसांपूर्वीच्याही असू शकतात मात्र तुम्हाला आवडतील किंवा तुम्ही पाहिल्या पाहिजेत असं त्यांना वाटतं.
हे पर्याय जारी उपलब्ध झाले असले तरी ते आपण Default म्हणून सेट करू शकणार नाही. सध्यातरी Default म्हणून Main Feed च उपलब्ध असेल.