यूट्यूबने आज एका ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे की यापुढे यूट्यूबवर असलेल्या कोणत्याही व्हिडिओवर डिसलाइकची संख्या दिसणार नाही. क्रिएटर्सना त्रास देण्यासाठी किंवा त्यांच्यावर डिजिटल हल्ला करण्यासाठी या डिसलाईक्सचा वापर करणं वाढल्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचं यूट्यूब तर्फे सांगण्यात आलं आहे. या नव्या बदलामुळे क्रिएटर आणि प्रेक्षक यांच्यामधील संवाद आदराने पार पडेल आणि त्यासाठी प्रोत्साहन मिळेल असंही यूट्यूबला वाटतं!
मार्च महिन्यात याबद्दल यूट्यूबने चाचणी करण्यास सुरुवात केली होती. शिवाय ज्याना आपल्या व्हिडिओवरील लाईक्स व डिसलाईक्सची संख्या दाखवायची नाही त्यांना तसा ही संख्या लपवण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र आता सरसकट सर्वच व्हिडिओवरील डिसलाईक्सची संख्या दिसणार नाही.
डिसलाईक्सची संख्या जरी दिसणार नसली तरी तुम्हाला डिसलाइक बटन मात्र अजूनही दिसेल आणि त्याची संख्या सर्वांना न दिसता फक्त ज्याने व्हिडिओ अपलोड केला आहे त्या क्रिएटरलाच पाहता येईल. त्यावरून त्याने आपल्या प्रेक्षकांना व्हिडिओ आवडला आहे की नाही ते ओळखता येईल.
डिसलाइकची संख्या म्हणजे सामान्य यूट्यूब पाहणाऱ्या व्यक्तीसाठी अमुक एखादा व्हिडिओ चांगला किंवा उपयोगी आहे की नाही हे तपासण्यासाठी पहिली गोष्ट असायची. मात्र आता तो पर्यायच नसल्याने तुम्हाला कॉमेंट्स पाहून (त्यासुद्धा Hide केल्या नसतील तर) किंवा मग व्हिडिओ पाहूनच सांगता येईल.
अनेकदा क्रिएटर्सना त्रास देण्यासाठी, कमी लेखण्यासाठी, त्यांनी वैयक्तिक मांडलेल्या मुद्यांशी मतभेद असतील तर कमेंट्स मध्ये, सोशल मीडियावर अमुक एका व्हिडिओला डिसलाइक करा अशा चक्क मोहिमा आयोजित करून मोठ्या प्रमाणात डिसलाइक केलं जातं. यामुळे त्या त्या क्रिएटर्सना मानसिक त्रास होऊ शकतो. असं छोट्या यूट्यूबर्ससोबत घडत असल्याचं यूट्यूबने सांगितलं आहे. त्यांनी केलेल्या प्रयोगात असा बदल केल्यामुळे तशा व्यक्तींकडून डिसलाइक बटनचा वापर कमी केला गेला कारण त्या डिसलाइक करण्याने कोणतीही संख्या कमी किंवा जास्त झालेली इतराना दिसणार नाही!
अर्थात यामागचा उद्देश चांगला असला तरी अनेक अपलोडर्स चुकीची माहिती, चुकीचा Thumbnail लावून व्हिडिओ अपलोड करतात आणि त्यांनी तसं केलं आहे त्याबद्दल नाराजी दर्शवण्यासाठी आजवर आपण करत असलेलं डिसलाइक बटन आता बदलत आहे. आमच्या म्हणण्यानुसार शॉर्ट्समुळे आधीच तिसरीकडे सुरू झालेला यूट्यूबचा प्रवास आता आणखी वेगळ्या वाटेने जाऊन वाईट कंटेंटमध्ये मोठी वाढ पाहायला मिळू शकते!
तुम्हाला माहीत नसेल तर यूट्यूबने स्वतः अपलोड केलेला YouTube Rewind 2018 हा व्हिडिओ आजवरचा सर्वाधिक डिसलाईक्स असलेला व्हिडिओ आहे!