MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

आज MrBeast ने टी सिरीजला मागे टाकत जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल बनण्याचा बहुमान मिळवला आहे! याचे आता तब्बल २६.६७ कोटी हून अधिक सबस्क्रायबर्स झाले आहेत. MrBeast ज्याचं खरं नाव जिमी डोनाल्डसन असं आहे याने २०२२ मध्ये जवळपास सलग दहा वर्षं सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेल्या प्युडीपाय (PewDiePie) या यूट्यूबर क्रिएटरला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं होतं आणि आता क्रिएटर्स वा कंपनी अशा एकूण सर्वच प्रकारच्या चॅनल्समध्ये टी सिरीजला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे!

MrBeast चं यूट्यूब चॅनल : https://www.youtube.com/MrBeast6000

मिस्टर बीस्ट (MrBeast) प्रचंड वेगाने त्याचे सबस्क्रायबर्स वाढवत आला असून याचे व्हिडिओ म्हणजे काही तरी अचाट प्रकार असतात. कधी विमान किंवा Lamborghini ला सलग अनेक तास हात लावायला बसवून त्या पाच सहा व्यक्तींपैकी जो शेवटी हात त्याला ते विमान/कार घेऊन देणे, काही व्यक्तींना एका गोलात उभं करून जो शेवटी बाहेर पडेल त्याला ५ लाख डॉलर्स देणे, एका घरावर दहा लाख ख्रिसमस लाइट्स लावणे, विली वोंकाची चॉकलेट फॅक्टरी बनवणे, Squid Game प्रत्यक्षात खेळून त्याची बक्षिसे देणे, $1 Vs $500000 विमानाचं तिकीट असे काहीही विषय असलेले व्हिडिओ बनवतो.

MrBeast चे सर्वात लोकप्रिय व्हिडिओज

या सर्व व्हिडिओना किमान १० ते १५ कोटी व्ह्यूज असतातच! यामुळेच पुढे याचे सबस्क्रायबर्स मोठ्या प्रमाणात वाढत गेले. २०१९ मध्ये याचे २ कोटी सबस्क्रायबर्स होते आणि आता पाच वर्षात ते थेट २६ कोटींवर पोहोचले आहेत. Netflix च्या मध्यंतरी चर्चेत असलेल्या Squid Games वर आधारित व्हिडिओला तर तब्बल ६१ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत! त्याचे व्हिडिओ करण्यासाठी सुरुवातीपासून त्याचे ४-५ मित्र सोबतीला असतात शिवाय मोठे व्हिडिओ शूट करण्यासाठीही तो आता मोठी टीम कामाला ठेवतोय! याच्या मुख्य चॅनलची सुरुवात २० फेब्रुवारी २०१२ मध्ये झाली होती.

आणि तो या सर्व व्हिडिओवर खरेच तेव्हढे लाखो रुपये खर्च करतो. अर्थात त्यानुसार त्याला व्ह्यूज मोठ्या प्रमाणात मिळतात आणि तेच पैसे तो पुढच्या व्हिडिओमध्ये गुंतवतो (असं त्याचं म्हणणं आहे)

विशेष म्हणजे याच MrBeast ने PewDiePie चे T Series च्या आधी १० कोटी सबस्क्रायबर्स पूर्ण व्हावेत म्हणून पैसे खर्चून जाहिराती करत ऑनलाइन मोहीम राबवली होती! बिलबोर्डस, एफएम, टीव्ही अशा सर्व ठिकाणी जात प्युडीपायच्या चॅनलला सबस्क्राइब करण्याचं आवाहन केलं होतं!

एका बाजूला यूट्यूब व्हिडिओवर प्रचंड पैसे खर्च करत असताना तो अधूनमधून सामाजिक कार्यासाठीही त्याच्या प्रसिद्धीचा वापर करतोय. २०१९ मध्येच त्याच्या यूट्यूब चॅनलचे २० मिलियन सबस्क्रायबर्स होत असताना ट्विटरवर प्रश्न विचारला की माझ्या २० मिलियन (२ कोटीव्या) सबस्क्रायबरला काय देऊ? तर त्यावर रेडिट या दुसऱ्या प्रसिद्ध वेबसाईटवर अनेकांनी त्याने २० मिलियन म्हणजे २ कोटी झाडे लावावीत असं सुचवलं. मग त्याने लगेच TeamTrees मोहीम सुरू केली आणि २ कोटी झाडे लावली सुद्धा…! यासाठी त्याने सोशल मीडिया मार्फत दान करण्याचं आवाहन केलं होतं त्याला इलॉन मस्क, Tobi Lutke (Shopify CEO), Marc Benioff (Salesforce CEO), Susan Wojcicki (YouTube CEO), Jack Dorsey (तेव्हाचे Twitter CEO) यांनीही मोठी मदत केली होती.

पुढे यासाठी त्यानं Beast Philanthropy नावाचं स्वतंत्र चॅनल सुरू केलं आणि समुद्र किनारा स्वच्छ करणे, आफ्रिकेत विहिरी बांधणे, बेघरांना घरे बांधून देणे, कपडे, जेवण उपलब्ध करून देणे अशीही कामे करण्यास सुरुवात केली. अशा कामांसाठी त्याच्या ऑनलाइन फॅन्सना आमंत्रित करून त्यांनाही सहभागी करून देतो. अर्थात त्याच्यावर नेहमीच पैसे उडवण्यावरून टीका होत असली तरी दुसऱ्या बाजूला त्याचे असेही प्रयत्न सुरू आहेत.

सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेले जगातले १० चॅनल्स पुढील प्रमाणे :

  1. MrBeast
  2. T Series
  3. Cocomelon
  4. SET India
  5. Kids Diana Show
  6. Vlad and Niki
  7. Like Nastya
  8. PewDiePie
  9. Zee Music Company
  10. WWE
Exit mobile version