गूगलतर्फे जाहीर झालेल्या माहितीप्रमाणे २७ सप्टेंबर रोजी म्हणजे आज त्यांचा अधिकृत तारखेनुसार पंचवीसावा वाढदिवस. इंटरनेटवर सर्च करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेबसाइट्समध्ये अनभिषिक्त सम्राट बनलेल्या गूगलचा वाढदिवस. इंटरनेट सर्चपासून सुरुवात झालेली या कंपनीकडून आता आपण दैनंदिन वापर करत असलेल्या गूगल, अँड्रॉइड, यूट्यूब, जीमेल, गूगल मॅप्स, क्रोम, गूगल मीट, वर्कस्पेस, गूगल पे अशा अनेक सेवा दिल्या जातात!
खरंतर गूगल कंपनीची स्थापना ७ सप्टेंबर १९९८ रोजी झाली. स्थापनेपासून २००४ पर्यंत कंपनीने सात सप्टेंबर याच दिवशी आपला वाढदिवस साजरा केला होता. मात्र २००५ पासून कंपनीने २७ सप्टेंबर हाच दिवस आमचा अधिकृत वाढदिवस असल्याचं जाहीर केलं आहे. स्थापनेपासून सर्वाधिक पेजेस इंडेक्स केल्याची तारीख त्यांनी आता वाढदिवस म्हणून ठेवली आहे.
कॅलिफोर्नियातील स्टँडफोर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी सात सप्टेंबर १९९८ रोजी गूगलची स्थापना केली होती. २०१५ मध्ये मूळ गूगल कंपनीला Alphabet नावाच्या नव्या कंपनी अंतर्गत समाविष्ट करून गूगलचं सीईओपद सुंदर पिचाई यांच्याकडे देण्यात आलं. त्यांनीही कंपनीच्या २५ व्या वाढदिवसासाठी आज खास पोस्ट लिहिली आहे.
गूगलने यानिमित्त एक पोस्ट आणि व्हिडिओ प्रकाशित केला आहे. पोस्ट लिंक : blog.google/inside-google/company-announcements/google-25th-birthday