काही वेळापूर्वी पार पडलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) कंपनी प्रमुख मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या कामगिरीबद्दल माहिती देत असताना जियोच्या 5G नेटवर्क, AirFiber, क्लाऊड पीसी, स्मार्ट होम उपकरणे आणि सेवा यांचा उल्लेख केला आहे. AirFiber ही वायरलेस इंटरनेट सेवा गणेश चतुर्थीपासून उपलब्ध होणार आहे.
जियोने आता ४५ कोटी ग्राहकांचा टप्पा ओलंडला असून दरमहा हे यूजर्स ११०० कोटी जीबी इंटरनेट वापरत आहेत!
- Jio 5G : जियोने जगातली सर्वात वेगाने 5G उपलब्ध करून देणारी कंपनी असल्याचं कंपनीतर्फे सांगण्यात आलं आहे. डिसेंबर २०२३ अखेर संपूर्ण देशात 5G नेटवर्क मिळेल असं कंपनीचं नियोजन आहे. एंटरप्राइज ग्राहकांसाठी Jio developer platform सुद्धा सुरू केला जाणार आहे.
- Jio AirFiber : ही सेवा १९ सप्टेंबरपासून उपलब्ध होईल. यामध्ये AirFiber चं राऊटरसारखं उपकरण आपल्या घरी बसवलेलं असेल जे कुठेही नेता येईल. जियोच्या 5G नेटवर्कमार्फत वायर्सशिवाय याद्वारे वेगवान इंटरनेट आपल्याला वापरता येईल.
- Jio Smart Home Services : AI च्या मदतीने घरातील विविध उपकरणे वायफायद्वारे नियंत्रित करता येतील. यासाठी Jio Home ॲप असेल.
- Jio Set Top Box : इंटरनेटद्वारे टीव्ही चॅनल्स पाहण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी हे उपकरण वापरता येईल.
- Jio Cloud PC : रिलायन्सने यासाठी HP सोबत भागीदारी केली असून हा स्वस्त लॅपटॉप इंटरनेटमार्फत (क्रोम लॅपटॉप्सप्रमाणे) चालेल.
- Giga Factory : बॅटरीची निर्मिती आणि रीसायकल करण्यासाठी मोठा प्रकल्प २०२६ पर्यंत उभारणार आहे.
- Jio Bharat4G : हा सर्वात स्वस्त 4G फोन ९९९ रुपयात मिळणार आहे.