भारतातील भुगर्भ सर्वेक्षण विभागाने ९ फेब्रुवारीला जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात लिथियमचे साठे आढळले असल्याचं जाहीर केलं असून हे साठे भारतात प्रथमच एव्हढया मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. तब्बल ५९ लाख टन लिथियम या ठिकाणी असू शकेल असं केंद्रीय खणीकर्म मंत्रालयाने सांगितलं आहे.
लिथियम (Lithium) हे प्रामुख्याने सर्व प्रकारच्या क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या बॅटरीच्या निर्मितीसाठी वापरलं जातं. मोबाइल फोन्स, लॅपटॉप्स, इलेक्ट्रिक गाड्या, इ. यामधील बॅटरीमध्ये शक्यतो लिथियम असतंच. मात्र भारताला आजवर यासाठी बाहेरच्या देशांवर अवलंबून राहावं लागत होतं. आता एव्हढया मोठ्या प्रमाणावर साठे आपल्याच देशात सापडल्यामुळे बॅटरी निर्मिती इथेच करणं आणि सोबत ते इतर देशांना विकणं सुद्धा शक्य होईल.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीमुळे साहजिकच अधिकाधिक बॅटरी आणि पर्यायाने लिथियम भारतीयांना लागणार आहेच. अशातच हा मोठा साठा आपल्याला मिळाला असल्यामुळे भारतातील बॅटरी निर्मितीसाठी नक्कीच चांगली गोष्ट असेल.
जगभरात उपलब्ध असलेला अंदाजे लिथियमचा साठा
- चिली : ९३ लाख टन
- ऑस्ट्रेलिया : ६२ लाख टन
- भारत : ५९ लाख टन
- अर्जेंटिना : २७ लाख टन
- चीन : २० लाख टन
- अमेरिका : १० लाख टन
भारतातील लिथियमबाबत सध्यातरी अंदाजे व्यक्त केलेल्या माहिती नुसार असून प्रत्यक्ष उत्खननावेळी प्रमाण कमी अधिक होऊ शकतं.
सध्या भारतात फोन्सची निर्मितीसुद्धा वाढत चालली आहे. या क्षेत्रात चीनसोबत स्पर्धा करण्यासाठीही या लिथियमचा भारताला उपयोग होईल.
अर्थात या लिथियमच्या खाणींमुळे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होऊन प्रदूषण सुद्धा वाढतं असा इतर देशांचा अनुभव आहे. यावर सरकार कसा मार्ग काढेल आणि त्यानुसार कोणती पावले उचलली जातील हे पुढे कळेल.