गेले काही महीने चाचणी सुरू असलेली गूगलची ChromeOS Flex आता सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून तुमच्याकडे असलेल्या जुन्या लॅपटॉप, पीसीमध्ये व्यवस्थित चालेल अशी ही क्लाऊड आधारित ऑपरेटिंग सिस्टम मोफत इंस्टॉल करता येते.
तुमच्याकडे असलेल्या जुन्या लॅपटॉप, पीसी, मॅकला ही आधुनिक इंटरनेटच्या माध्यमातून चालणारी सुरक्षित आणि अपडेटेड ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यास सोपी आणि मोफत असणार आहे.
या ओएस मुळे आपला लॅपटॉप/पीसी अप्रत्यक्षरित्या क्रोमबुक प्रमाणे काम करतो. क्रोमओएस ही गूगलच्या बहुतेक सर्वच सेवा इंटरनेटद्वारे आपल्याला जुन्या आणि कमी क्षमतेचं हार्डवेयर असलेल्या उपकरणांवरही सहज वापरता येते. एका अर्थी ही पूर्ण ऑपरेटिंग सिस्टम क्रोम ब्राऊजरप्रमाणे काम करते. लॅपटॉप सुरू करताच अवघ्या काही सेकंदात ही ओएस बूट होते (होय अगदी जुन्या लॅपटॉप्सवरसुद्धा!)
या नव्या ChromeOS Flex मुळे इ कचऱ्याची समस्या सुद्धा काही प्रमाणात कमी होऊ शकते असं गूगलने म्हटलं आहे. ही ओएस चक्क एका पेनड्राइवमार्फतसुद्धा चालवता येते!
या ओएसमध्ये व्हायरस किंवा मॅलवेयरचा त्रास नाही, गूगलच्या क्रोमओएस प्रमाणे पूर्ण सुरक्षित, वेळोवेळी अपडेट्स मिळतील.
याची इंस्टॉल करण्याची प्रक्रिया https://support.google.com/chromeosflex/answer/11552529 या लिंकवर पाहू शकता.
(तुमच्या लॅपटॉपमध्ये असलेला आधीच्या डेटाचा बॅकअप घेऊन मगच यामधील कृती करा.)
तुमचे जुने लॅपटॉप/पीसी जे वापरात नाहीत किंवा स्लो झाल्यामुळे तुम्ही बाजूला ठेवले आहेत त्यांना यामुळे नवं आयुष्य मिळेल आणि मग तुम्ही लॅपटॉप गरजू विद्यार्थी/व्यक्तीला देऊ शकता. त्यांना त्यानंतर फक्त इंटरनेट कनेक्शनची गरज लागेल जे फास्ट नसलं तरी चालू शकेल.
गूगलच्या क्रोमओएसला लॅपटॉप्सवर उपलब्ध करून देणारी CloudReady (Neverware) कंपनी २०२० मध्ये गूगलने अधिग्रहीत केली होती आता त्यांनी त्यांचं उत्पादन सर्वाना उपलब्ध करून दिलं आहे.