मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचा अविभाज्य भाग असलेला इंटरनेट एक्स्पलोरर हा डेस्कटॉप वेब ब्राऊजर सरतेशेवटी आजपासून बंद होणार आहे. यापुढे या ब्राऊजरला सपोर्ट/अपडेट्स दिले जाणार नाहीत. विंडोजमध्ये याची जागा आता क्रोमियम आधारित मायक्रोसॉफ्ट एज (Edge) ब्राऊजरने घेतली आहे.
हा ब्राऊजर प्रथम विंडोज ९५ मध्ये जोडण्यात आला होता तेव्हापासून बरीच वर्षं या IE ब्राऊजरने इंटरनेट विश्वाचा वाटाड्या म्हणून काम पाहिलं. पुढे २००८ मध्ये गूगल क्रोम आल्यानंतर याचा वापर कमी कमी होत गेला. २०१५ मध्ये स्वतः मायक्रोसॉफ्टनेच त्यांचा नवा मायक्रोसॉफ्ट एज (Edge) ब्राऊजर देण्यास सुरुवात केली होती.
२०२० मध्ये मायक्रोसॉफ्टने स्वतःच्या एज ब्राऊजर इंजिनऐवजी पुढील आवृत्तीसाठी क्रोमियमचा वापर करणार असल्याचं जाहीर करून नवी आवृत्ती उपलब्ध करून दिली होती. आता हा क्रोमियम आधारित ब्राऊजर जगातला सर्वाधिक वापरला जाणारा गूगल क्रोमनंतर दुसऱ्या क्रमांकाचा ब्राऊजर आहे. तिसऱ्या क्रमांकावर ॲपलचा सफारी ब्राऊजर आहे. हे तिन्ही ब्राऊजर क्रोमच्या ओपन सोर्स असलेल्या क्रोमियम इंजिनचाच वापर करतात! सध्या फक्त फायरफॉक्सच स्वतःचं इंजिन वापरत असून उर्वरित सर्वच प्रसिद्ध ब्राऊजर क्रोमियमवर आधारित आहेत.
इंटरनेट एक्सप्लोररमध्ये काळानुसार योग्य ते बदल न झाल्यामुळे त्याची सर्वात सावकाश चालणारा ब्राऊजर अशी ओळख बनली आणि अजूनही त्यावर मीम्स येत असतात.
भारतात अजूनसुद्धा बऱ्याच सरकारी वेबसाइट्स इंटरनेट एक्सप्लोरर शिवाय चालत नव्हत्या. यामध्ये आता कदाचित बदल झाला असेल. यासाठीच त्यांच्या बिझनेस ग्राहकांसाठी ते हा ब्राऊजर आणखी काही वर्षं सुरू ठेवतील आणि त्यांना नव्या ब्राऊजरवर आणण्यास मदत करतील असं सांगितलं आहे.