गूगलने त्यांच्या Google I/O या डेव्हलपर कार्यक्रमात गूगलचा नवा स्मार्टफोन Pixel 6a जाहीर केला असून हा भारतातसुद्धा उपलब्ध होणार आहे असंही सांगितलं आहे. यासोबत अँड्रॉइडची नवी Android 13 आवृत्ती चाचणीसाठी उपलब्ध करून दिली आहे. शिवाय कोंकणीचा गूगल ट्रान्सलेटमध्ये समावेश, गूगल सर्च आणि गूगल मॅप्समधील नव्या सोयी, नंतर येणारा Google Pixel 7 & 7 Pro, Pixel टॅब्लेट, स्मार्ट ग्लासेस यांचीही माहिती देण्यात आली आहे.
गूगलने अलीकडे त्यांचे बरेच पिक्सल फोन्स मॉडेल्स भारतात आणले नव्हते. त्यामधील काही सोयीमुळे किंवा काही इतर कारणांनी त्यांनी त्यांनी Pixel 5, Pixel 6 मालिका भारतात आणलीच नाही. मात्र आता हा तुलनेने कमी सोयी असलेला Pixel 6a भारतात उपलब्ध होतोय असं अधिकृतरित्या सांगण्यात आलं आहे.
या फोनमध्ये 6.1 इंची Full HD+ OLED HDR डिस्प्ले, 60Hz रिफ्रेश रेट, गूगलचा स्वतःचा Tensor प्रोसेसर, 6GB रॅम, 128GB स्टोरेज, 12.2MP+12MP ड्युयल कॅमेरा सेटप, 8MP फ्रंट कॅमेरा, 4410mAh बॅटरी, Wi-Fi 6+6E, Bluetooth 5.2, IP67 water आणि dust resistance, in-display fingerprint scanner अशा सोयी देण्यात आल्या आहेत. या फोनची भारतातली किंमत जाहीर करण्यात आलेली नसली तरी अंदाजे ४०००० च्या आसपास असेल असं म्हटलं जात आहे. सध्या उपलब्ध फोन्सच्या तुलनेत यामधील हार्डवेयर नक्कीच मागं पडेल आणि वरून किंमतसुद्धा बरीच जास्त वाटेल.
या फोनमधील Adaptive Battery सोयीमुळे २४ तासांपर्यंत चालेल असं गूगलने सांगितलं आहे! Android 13 मुळे यामध्ये अनेक नव्या सोयी पाहायला मिळतील.