सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेली गेम म्हणजे वर्डल (Wordle). अवघ्या चार महिन्यात लाखो प्लेयर्स ही गेम खेळत असून शब्दांचा हा खेळ खूपच लोकप्रिय आहे. न्यूयॉर्क टाइम्स या माध्यमसमूहाने ही गेम विकत घेतली असल्याचं ३१ जानेवारीला जाहीर केलं असून यासाठी बऱ्यापैकी मोठी रक्कम मोजली आहे.
ही गेम जॉश वार्डल (Josh Wardle – @powerlanguish) याने तयार केली असून यामध्ये आपल्याला रोज एक पाच अक्षरी शब्द ओळखायचा असतो ज्यासाठी आपल्याला सहावेळा प्रयत्न करता येतो. आपण अंदाजे टाइप केलेल्या अक्षर योग्य जागी आहे का किंवा ते अक्षर त्या शब्दामध्ये आहे का किंवा ते अक्षर या शब्दाचा भाग नाहीच यासाठी वेगळे तीन रंग दर्शवले जातात. त्यानुसार आपला अंदाज किती बरोबर आहे हे समजत जातं.
वर्डल गेमची लिंक : https://www.powerlanguage.co.uk/wordle/
हा गेम इतका ट्रेंड होत आहे की याच्या प्रत्येक शब्दासाठी लाखो ट्विटस/पोस्ट्स केल्या जात अहेत. एकाने तर पुढील शब्द ओळखून ट्विट करणारा ट्विटर बॉट तयार केला होता. नंतर ट्विटरला स्वतःहून तो बंद करावा लागला. शिवाय गूगलवरही आता wordle असं सर्च केल्यावर त्यांचा लोगोचा रंग त्या गेममधील टाइल्सप्रमाणे बदलतो.
नोव्हेंबरमध्ये आलेल्या या गेमला त्या महिन्यात फक्त ९० प्लेयर्स मिळाले होते आणि आता ती संख्या लाखोंवर पोहोचली आहे. न्यू यॉर्क टाइम्सला गेम विकण्याच्या डेव्हलपरच्या निर्णयावर मात्र अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या बातम्या/लेखच Paywall च्या आड ठेवलेल्या असतात आणि पैसे दिल्याशिवाय ते वाचता येत नाही. मग गेम बाबतीतसुद्धा तसच होऊ शकतं असं या यूजर्सना वाटत आहे.
यावर डेव्हलपरने ट्विट करून माहिती दिली आहे की ही गेम पुढेही मोफत उपलब्ध राहणार आहे. मात्र न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकात त्यांनी ही गेम ‘सध्यातरी’ फ्री आहे असं म्हटलं आहे!