होय गूगल या बरीच वर्षं सर्वात भेट दिली जात असेल्या वेबसाइट डोमेनला मागे टाकत यावर्षी टिकटॉक.कॉम सर्वात पुढे आलं आहे! शॉर्ट व्हिडिओ शेयरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकने सर्वात लोकप्रिय आणि जवळपास प्रत्येकाकडून वापरल्या जाणाऱ्या गूगलला मागे टाकलं आहे. क्लाऊडफ्लेयर (Cloudflare) या वेब सेक्युरिटी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही नवी क्रमवारी प्रसिद्ध झाली आहे.
Top 10 Most Visited Websites (domains) of 2021
- TikTok.com
- Google.com
- Facebook.com
- Microsoft.com
- Apple.com
- Amazon.com
- Netflix.com
- YouTube.com
- Twitter.com
- WhatsApp.com
यावर्षी टिकटॉक, गूगलनंतर पुढे फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, ॲमेझॉन, नेटफ्लिक्स, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सॲप असा क्रम लागला आहे. गेल्यावर्षी ७ व्या क्रमांकावर असलेलं टिकटॉक आता थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आहे! तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेलं Instagram.com मात्र यावर्षी पहिल्या दहामधून बाहेर गेलं आहे!
अल्पावधीतच टिकटॉकला मिळत असलेलं यश पाहून शॉर्ट व्हिडिओ फॉरमॅटसाठी स्पर्धेतून इंस्टाग्रामने Reels आणि यूट्यूबने Shorts आणून सुद्धा त्यांना टिकटॉकच्या लोकप्रियतेला धक्का पोहोचवता आलेला नाही. यावरून सध्या सोशल मीडियावर कोणत्या प्रकारचा कंटेंट जास्त पाहिला जात आहे याचीही एक कल्पना येऊ शकते. अशा लवकर संपणाऱ्या, पटापट पुढे सरकत जाणाऱ्या व्हिडिओज पाहण्याचं वेड आता प्रत्येक वयोगटात लागलेलं आहे.
विशेष म्हणजे टिकटॉक हे भारतात बॅन करण्यात आलेलं ॲप आहे. त्यामुळे यांच्या वेबसाइट ट्रॅफिकमध्ये भारतासारख्या मोठ्या देशाचा समावेश नसतानासुद्धा एव्हढया वरचं स्थान त्यांना मिळालं आहे!
२०२१ मध्ये सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया डोमेन्समध्येही साहजिकच टिकटॉक आघाडीवर असून त्यानंतर फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, रेडिट, पिनट्रेस्ट, लिंक्डइन आणि कोरा अशी क्रमवारी आहे.
Top 10 — Most popular social media domains 2021
- TikTok.com
- Facebook.com
- YouTube.com
- Twitter.com
- Instagram.com
- Snapchat.com
- Reddit.com
- Pinterest.com
- LinkedIn.com
- Quora.com
गेल्यावर्षी म्हणजे २०२० मध्ये सर्वात लोकप्रिय डोमेन्सची यादी पुढील प्रमाणे होती : 1. Google.com, 2. Facebook.com, 3. Microsoft.com, 4. Apple.com, 5. Netflix.com, 6. Amazon.com, 7. TikTok.com, 8. YouTube.com, 9. Instagram.com, 10. Twitter.com
माहितीसाठी : डोमेन म्हणजे प्रत्येक वेबसाइटला जोडण्यात आलेला एक विशिष्ट पत्ता असतो. उदा. गूगलच्या वेबसाइटचं google.com हे डोमेन नेम आहे.