डोमेन आणि होस्टिंग मधील आघाडीची कंपनी गोडॅडी (GoDaddy) हॅक झाली असून त्यांच्या जवळपास १२ लाख ग्राहकांचा डेटा हॅक झाल्याची माहिती दिली आहे! १७ नोव्हेंबरला त्यांच्या Managed WordPress होस्टिंगमध्ये त्यांना संशयास्पद ॲक्टिविटी दिसून आली. ज्यामुळे असं कळलं की त्यामध्ये सापडलेले पासवर्ड वापरून हॅकर्स लॉगिन करण्याचा प्रयत्न करत होते!
WordPress अकाऊंट्सच्या ईमेल आयडी आणि पासवर्ड सोबत sFTP डेटाबेसचा यूजरनेम, पासवर्ड आणि काही ग्राहकांचा तर SSL प्रायव्हेट कीसुद्धा हॅकर्सच्या हाती लागल्या आहेत! याबद्दलची माहिती त्यांनी US Securities and Exchange Commission कडे दिली आहे. हॅकर्सना ही माहिती ६ सप्टेंबरपासून मिळू लागली होती आणि गोडॅडीला हे १७ नोव्हेंबरला समजलं!
गोडॅडी या हॅकचा तपास करत असून आयटी फॉरेन्सिक आणि कायद्यासंबंधित विभागाला या तपासात समाविष्ट करण्यात आलं आहे. ज्या ज्या अकाऊंटचा हॅकमध्ये समावेश आहे त्यांचे आयडी पासवर्ड रिसेट करण्यात आले आहेत आणि नवीन SSL Certificate देण्यात येत आहेत असं सांगितलं आहे.
गोडॅडीने जरी पासवर्ड्स रिसेट केले असले तरीही सुरक्षिततेसाठी तुम्हीही स्वतः पासवर्ड्स बदलून घ्या जेणेकरून तुमचं अकाऊंट त्या हॅक मध्ये होतं की नाही हे पाहत बसावं लागणार नाही. यामध्ये नेमके कोणते यूजर्स आहेत त्याची माहिती गोडॅडीने दिलेली नाही. शिवाय याबद्दल अद्याप कोणतंही ट्विटसुद्धा करण्यात आलेलं नाही हे विशेष!