अडोबी फॉटोशॉप आता वेबसाइटद्वारे ब्राऊजरमध्येच वापरा!

Adobe Photoshop Web

क्रिएटर्स आणि फोटो एडिटिंग साठी वापरलं जाणारं सर्वात लोकप्रिय सॉफ्टवेअर म्हणजे अडोबी कंपनीचं फॉटोशॉप. काल झालेल्या Adobe Max कार्यक्रमात त्यांनी अनेक नव्या गोष्टी जाहीर केल्या असून यामध्ये विशेष ठरेल अशी घोषणा होती ती म्हणजे फॉटोशॉप आता त्यांच्या वेबसाइटवर वापरता येणार आहे याचा अर्थ तुमच्याकडे फॉटोशॉप इंस्टॉल केलेलं नसेल तरीही तुम्ही बेसिक एडिटिंगसाठी ऑनलाइन पर्याय वापरू शकता.

नवा पर्याय ऑफिस ३६५, गूगल डॉक्स प्रमाणे ऑनलाइन काम करेल. Photoshop and Illustrator दोन्हीची वेब आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. गूगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज ब्राऊजरमध्येच हा पर्याय वापरता येईल. या पर्यायाची सध्या चाचणी सुरू करण्यात आली आहे.

ही वेबसाइट सेवा जर तुमच्याकडे अडोबी क्रिएटिव क्लाऊडचं सभासदत्व असेल तरच वापरता येईल याची नोंद घ्या. मात्र तुम्ही तुमच्या क्लायंटना केलेलं काम दाखवण्यासाठी याचा वापर करणार असाल तर त्यासाठी क्लायंटना सभासदत्व घेण्याची गरज नाही ते तुमची फाइल उघडून जे काही बदल आहेत ते कॉमेंटद्वारे सांगू शकतील. त्यानंतर तुम्ही बेसिक एडिट्स करून लगेच ऑनलाइन सेव्ह करू शकाल!

या सोबतच अडोबीने फॉटोशॉप, आफ्टर इफेक्टस, प्रीमियर प्रोच्या नव्या आवृत्त्या आणि त्यामधील नव्या सोयीबद्दल माहिती जाहीर केली आहे. blog.adobe.com वर अधिक वाचू शकता.

जर तुम्हाला याच गोष्टी करण्यासाठी मोफत ऑनलाइन पर्याय हवा असेल तर PhotoPea (www.photopea.com) आधीपासून उपलब्ध आहे. हे अधिकृत फॉटोशॉप नसलं तरी त्यासारखं डिझाईन दिलेलं आहे. याद्वारे तुम्ही कधीही ब्राऊजर उघडून बेसिक एडिटिंग करून फाइल्स सेव्ह करू शकता.

Exit mobile version