लवकरच येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ॲमेझॉनने ग्राहकांना मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आता मराठीचा वापर करून ऑनलाइन खरेदी करू शकता अशी घोषणा ॲमेझॉन इंडियाने काही दिवसांपूर्वी केली आहे. इंग्रजी, हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम या भाषांनंतर ॲमेझॉन मराठी व बंगाली भाषेत वापरता येईल. गेल्या काही दिवसांपासून हा पर्याय ॲपवर उपलब्ध झालेला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना ॲमेझॉनने या नव्या उपक्रमांमुळे भाषेचा अडथळा दूर होत आहे आणि ई कॉमर्स भारतात लक्षावधी ग्राहकांसाठी उपलब्ध होत ते वापरणं सोयीस्कर होत आहे असं सांगितलं आहे. मराठी भाषेत सुरू करण्याच्या प्रक्रियेदरम्यान, ॲमेझॉनने प्रत्येक भाषेमध्ये अचूक व समजण्याजोगा यूजर अनुभव विकसित करण्यासाठी कुशल भाषातज्ज्ञांसोबत काम केले आहे. अचूक भाषांतर करण्याऐवजी टीमने अधिक वापरात असलेल्या संज्ञांचा वापर केला आहे, जेणेकरून खरेदीचा अनुभव अस्सल, समजण्यास सोपा आणि ग्राहकांसाठी सुखद व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे!
२०२१ मध्ये तब्बल ५० लाख ग्राहकांनी भारतीय भाषांमध्ये ॲमेझॉनचा वापर करत खरेदी केली आहे! फेब्रुवारी २०२१ मध्ये ॲमेझॉनने त्यांची सेलर (Seller) रजिस्ट्रेशन सेवासुद्धा मराठीमध्ये आणली आहे जी मराठी भाषिक विक्रेत्याना ॲमेझॉनवर येण्यास मदत करेल.
गेले अनेक महिने अनेक मराठी ग्राहकांकडून ट्विटरवर यासंबंधी मागणी केली जायची. तमिळ, तेलुगू, कन्नड भाषाही जोडल्या गेल्या मात्र मराठी मात्र अजूनही जोडण्यात आली नव्हती. मराठीसाठी कार्य करणारे लोक आणि अनेक संघटनाही यासाठी प्रयत्नशील होत्या. गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या कार्यकर्त्याकडून याची मागणी करण्यात आली. यासाठी पक्षातर्फे अखिल चित्रे यांनी विशेष पुढाकार घेऊन फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन दोघांनाही याबद्दल निवेदन देऊन मागणी करण्यात आली. दोन्ही वेबसाइटच्या अधिकाऱ्यांनी दिवाळीनंतर समावेश करू असं आश्वासन दिलं.
फ्लिपकार्टवर ८ जानेवारीपासून मराठी भाषा उपलब्ध झाली होती. मात्र ॲमेझॉनने अजूनही चालढकल सुरूच ठेवली होती. सरते शेवटी २० तारखेला मराठी आणि बंगाली अशा दोन्ही भाषांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सेवा पुरवणाऱ्या सर्वच कंपन्यांनी मराठी भाषेत सेवा द्यायलाच हवी. महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशात सर्वच राज्यांमध्ये त्या त्यात ठिकाणच्या राज्य भाषांचाच वापर प्रामुख्याने व्हायला हवा. सर्व्हिस सेंटर्स, कॉल सेंटर्समध्ये त्या त्या भाषांमधील पर्याय असल्यास अनेकांना ते वापरणं सोपं होणार आहे. मराठीत मागणी झाल्यामुळे मराठीच्या वाढीस हातभार लागून स्थानिक लोकांना संबंधित नोकऱ्या मिळण्यासाठी मदत होईल. यामागचं अर्थकारण लोक लक्षात घेऊन अधिकाधिक सेवांमध्ये मराठीची मागणी करून मराठीचासुद्धा वापर करतील असं चित्र दिसलं पाहिजे.