आज अनेक वर्षानंतर मराठीटेक या आपल्या तंत्रज्ञानविषयक माहिती देणाऱ्या वेबसाइटचा नवा लोगो, नवी ओळख आपल्या समोर आणत आहोत. बघता बघता आमच्या या वेबसाइटने दहा वर्षे पूर्ण केली असून आपल्या सारख्या वाचकांच्या प्रतिसादामुळे एव्हढया वर्षांचा मोठा प्रवास करणं शक्य झालं आहे.
बऱ्याच वर्षांपासून इंटरनेटवर माहिती पाहत असताना जवळपास सर्वच माहिती इंग्लिश मध्ये उपलब्ध असायची. यामधील ठराविक विषय तरी किमान आपल्या मायबोलीमध्ये वाचायला मिळायला हवे असं नेहमी वाटायचं. यासाठीच मराठीटेकची सुरुवात करताना २००८ मध्ये गूगलच्या ब्लॉगरवर marathitech ची नोंदणी केली होती. त्यानंतर यामधील काही तांत्रिक गोष्टी शिकत शिकत २०११ पासून नियमित लेख लिहिण्यास सुरुवात केली होती. आता नेमकी तारीख उपलब्ध नाही पण कालावधी नक्कीच दहा वर्षांपेक्षा अधिक पूर्ण झाला आहे आणि हे काही दिवसांपूर्वीच बोलता बोलता सहज लक्षात आलं. त्यामुळे या निमित्ताने गेली अनेक वर्षं न बदललेला आपल्या या वेबसाइटचा लोगो व डिझाईन बदलण्याचा निर्णय घेतला आणि आज तो प्रकाशित करत आहोत… नव्या लोगोसोबत आम्ही अधिकाधिक माहितीपूर्ण लेख, सोशल मीडिया पोस्ट्स, व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहोत…
नवा लोगो मराठीटेकच्या सोशल मीडिया हॅंडल्सवर पाहू शकता. वेबसाइटचं नवं रूप १५ ऑगस्ट २०२१ पासून पाहायला मिळेल.
या निमित्ताने मराठीटेकला विशेष सहकार्य करणाऱ्या माझ्या मित्रांना धन्यवाद देऊ इच्छितो. मराठीटेकवरील बरेचसे लेख मी स्वतःच लिहीत असलो तरी मध्यंतरी
कौस्तुभ शिंदे आणि स्वप्निल भोईटे यांनीही काही महत्वाच्या विषयांवरील लेख लिहिले आहेत. यासाठी दोघांचेही मनापासून आभार.
मराठीटेकच्या सोशल मीडिया पोस्ट्ससाठी, व्हिडिओ शूटसाठी, काही व्हिडिओना आवाज देण्यासाठीसुद्धा वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सुमेध पाटील यांना मनापासून धन्यवाद.
मराठीटेकच्या यूट्यूब चॅनलवरील प्रॉडक्ट व्हिडिओ शूट करण्यासाठी आम्हाला नेहमी ज्यांचं सहकार्य लाभतं त्या अभिषेक देशपांडे यांना या निमित्ताने धन्यवाद.
मराठीटेकचा नवा लोगो सोलापूर येथील आर्टिस्ट पियुष पोरे यांनी डिझाईन केला असून मराठीटेकची नवी ओळख तयार करण्यासाठी ग्राफिक्ससंदर्भात सहकार्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार.
या निमित्ताने आमच्या आजवरच्या प्रवासाबद्दल दोन (किंवा अधिक) शब्द …
शाळेत असतानाच नवनव्या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेण्याची आवड होती. मग ही माहिती मराठीत भाषेतून इंटरनेटवर उपलब्ध करून द्यावी ब्लॉगरवर सुरू केलेली वेबसाइट २०१९ पासून आम्ही वर्डप्रेसवर प्रकाशित केली आहे. यानंतर मराठीटेकवरील वाचकवर्ग अनेक पटींनी वाढला. फेसबुक, ट्विटर, यूट्यूब अशा सोशल मीडिया आणि वेबसाइटवरील लेख यांची सांगड घालण्याचा छोटा प्रयत्न आम्ही केला आहे. आज सांगायला आनंद होत आहे की मराठीटेक ही मराठीमध्ये सर्वाधिक काळ सुरू असलेली (Active) Tech/तंत्रज्ञान विषयक वेबसाइट आहे.
आजवर मराठीटेकच्या मार्फत लाखो वाचकांनी नवनव्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळवली आहे. मराठी टायपिंगसारख्या विषयांवरील लेख तर अनेकांना उपयोगी ठरले आहेत.
मराठीटेकच्या फेसबुक पेजला १६०००+ लाईक्स, यूट्यूब चॅनलला ९६००+ सबस्क्रायबर्स, ट्विटरवर ९०००+ फॉलोअर्सच्या रूपात वाचकांचा प्रतिसाद मिळाला आहे. यूट्यूबवर आमच्या व्हिडिओना १४,००,०००+ व्ह्यूज आहेत. मराठी टायपिंगचे आमचे व्हिडिओ पाहून लाखो लोक त्यांच्या कम्प्युटर व फोन्सवर मराठी भाषेत लिहीत आहेत.
अर्थात दहा वर्षाचा प्रवास सांगत असताना ही संख्या काही प्रमाणात कमी वाटते हे मान्य. पण याला अनेक कारणे आहेत त्यापैकी एक म्हणजे आम्ही कधीही वाचकांना त्रास होईल/फसवणूक होईल अशी शीर्षके (क्लिकबेट) असलेले लेख प्रकाशित केले नाहीत. अजूनही आम्ही फक्त मोबाइल फोन्स, व्हॉटसअप आणि प्लॅन्स या गोष्टींवरच लेख लिहिणं टाळून इतर विषयांचीही माहिती जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो. मराठीटेकवर बरेच लेख असे वाचायला मिळतील ज्या विषयांवर यापूर्वी मराठीत कसलीच माहिती उपलब्ध नव्हती.
आम्ही मराठीटेक सुरू असताना वाचकांना केवळ वाचकांना उपयुक्त माहिती मिळावी हाच एक उद्देश समोर ठेऊन कोणत्याही उत्पन्नाशिवाय हा उपक्रम बरीच वर्षे सुरू ठेवला होता. मराठीत गूगल ॲडसेन्सचा सपोर्ट येइपर्यंत आम्ही कधीही जाहिराती सुद्धा दाखवल्या नाहीत कारण इतर अॅड नेटवर्क्सच्या जाहिराती वाचकांना सुसंगत वाटणार नाहीत अशा स्पॅमने भरलेल्या असायच्या. आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांच्या शंकांचं निरसनसुद्धा करत असतो.
मराठीमध्ये अजूनही एकाच ठराविक विषयाला वाहून घेतलेल्या साइट्सची संख्या बरीच कमी आहे. ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आणखी वेगवेगळ्या विषयांवर कशाप्रकारे माहिती मांडता येईल याबद्दलही आम्ही लवकरच लेख/व्हिडिओ प्रकाशित करणार आहोत…
मराठीटेक मार्फत आम्ही गूगल ट्रान्सलेटमध्ये ५००० हून अधिक शब्द भाषांतरित करून देशात प्रथम पाचमध्ये स्थान मिळवलं होतं. झी मराठी दिशा मध्ये आमच्या उपक्रमाची दखल घेण्यात आली होती. ABP माझाच्या डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रमात मराठीटेकबद्दल माहिती देण्याची संधी मिळाली होती. मराठीटेकचा कंटेंट आता वेबसाइट, सोशल मीडिया, अँड्रॉइड ॲप, यूट्यूब चॅनल, डेलीहंट, गूगल न्यूज अशा माध्यमांवर उपलब्ध आहे.
आजपर्यंत मिळालेलं आपणा सर्वांचं सहकार्य यापुढेही असेल मिळत राहो ही अपेक्षा…
सूरज बागल (संस्थापक – मराठीटेक)