आजपर्यंत आपण विविध देशांतर्फे उपग्रह, रॉकेट्स, अवकाशयान अंतराळात झेपावताना पाहिले आहेत. काल व्हर्जिन गॅलॅक्टिक या स्वतःच्या कंपनीमार्फत रिचर्ड ब्रॅन्सन यांनी अंतराळवीर आणि इतर सहकारी यांच्यासोबत VSS Unity नावाच्या अवकाशविमानातून उड्डाण केलं आणि पृथ्वीच्या कक्षेबाहेर काहीसा प्रवास करून तब्बल ८८ किमी उंची गाठली आणि यशस्वीरित्या पुन्हा पृथ्वीवर परतले!
व्हर्जिन या ब्रिटिश कंपनीचे प्रमुख असलेले ७० वर्षीय रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीच्या अवकाशविमानातून प्रवास करत स्वतःच्याच स्पेसशिप मार्फत प्रवास करणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्या या मोहिमेमुळे आता अवकाशप्रवासासाठी खाजगी पर्यायसुद्धा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल पडलं आहे.
तांत्रिकदृष्ट्या VSS Unity हे नेहमीसारखं अवकाशयान म्हणता येणार नाही. हे एक मोठं विमान आहे (WhiteKnight Carrier Aircraft) जे एक छोटं विमान/यान (VSS Unity) अवकाशात नेऊन सोडून देतं उर्वरित प्रवास ते छोटं यान पूर्ण करून पृथ्वीवर परत येतं. जवळपास एक तास दहा मिनिटांचा हा प्रवास होता.
यामध्ये त्यांच्यासोबत Beth Moses, Colin Bennett आणि भारतात जन्मलेल्या Sirisha Bandla यांचा सहभाग होता. यांचा एकंदर अनुभव तुम्ही लेखाच्या शेवटी दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता.
खरतर रिचर्ड ब्रॅन्सन हा प्रवास ह्या महिन्यात करणार नव्हते मात्र काही दिवसांपूर्वी Amazon चे संस्थापक जेफ बेझोस यांनीही त्यांच्या ब्ल्यु ओरिजिन मार्फत २० जुलै रोजी अंतराळ प्रवास करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यावर पहिला व्यक्ती बनण्याच्या उद्देशाने रिचर्ड यांनी लवकरच उड्डाण करण्याचं ठरवून ते पूर्णसुद्धा केलं आहे.
अवकाश पर्यटनासाठी आता पर्याय उपलब्ध होताना दिसत असून याद्वारे तुम्ही तुमची जागा आरक्षित करून अवकाशात प्रवास करून पृथ्वीगोल पाहून Weightlessness चा अनुभव घेऊन पृथ्वीवर परत येऊ शकता. व्हर्जिन गॅलॅक्टिकच्याच प्रवासासाठी तब्बल ६०० सेलेब्रिटी/श्रीमंत व्यक्तींनी नोंदणी केली आहे. यामध्ये टॉम हँक्स, लियोनार्डो डीकॅप्रिओ, लेडी गागा, जस्टीन बिबर, केटी पेरी, इ. सेलेब्रिटीचा समावेश आहे. यासाठी त्यांनी प्रत्येकी तब्बल 2,50,000 डॉलर्स म्हणजे जवळपास १ कोटी ८७ लाख रुपये मोजले आहेत! कंपनीच्या म्हणण्यानुसार वर्षाला ४०० उड्डाणं करता येतील आणि यामधून 10 ते 15 बिलियन डॉलर्सचं उत्पन्न मिळेल असंही सांगितलं आहे!
यामुळे प्राथमिक अवस्थेत असतानाच अतिश्रीमंत व्यक्तींची अवकाश पर्यटनासाठी पर्याय देण्यास स्पर्धा सुरू झाल्याचं उघड दिसून येत आहे. जेफ बेझोस यांची ब्ल्यु ओरिजिन, रिचर्ड ब्रॅन्सन यांची व्हर्जिन गॅलॅक्टिक आणि इलॉन मस्क यांची स्पेसएक्स अशा तिन्ही कंपन्या त्यांच्या त्यांच्या मोहिमा जाहीर करत आहेत. यामध्ये व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या यशस्वी मोहिमवेळी मुद्दाम ब्ल्यु ओरिजिनने ट्विट करून दोन्ही पर्यायांची तुलना केली आहे. ज्यावर आता अनेक जण टीकासुद्धा करत आहेत.