Windows 11 लवकरच येत आहे : नवं डिझाईन पाहायला मिळणार!

मायक्रोसॉफ्टने २४ जूनला विंडोजसाठी एक खास कार्यक्रम नियोजित केला असून यामध्ये विंडोजची नवी आवृत्ती Windows 11 सादर केली जाणार आहे. यासाठी जाहीर केलेल्या इमेजमध्ये त्यांनी 11 ही संख्या दाखवली होती. सोबत एक ११ मिनिटांचा विंडोज साऊंडचाही व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. शिवाय या कार्यक्रमाची वेळसुद्धा तिकडे ११ वाजताचीच निवडण्यात आली आहे. यामुळे Windows 11 हे नाव तर नक्की करण्यात आलं आहे हे स्पष्ट होत आहे.

खरंतर मायक्रोसॉफ्टने २०१५ मध्ये विंडोज १० ही विंडोजची शेवटची आवृत्ती असेल असं सांगितलं होतं आणि विंडोज १० लाच पुढे अपडेट केलं जाईल असं ठरवण्यात आलं होतं. मात्र आता मायक्रोसॉफ्ट त्यांच्या आधीच्या व्यक्तव्यावरून माघार घेत नवी आवृत्ती आणत असल्याची शक्यता आहे. त्यांनी विंडोज १० च्या पेजवर आता विंडोज १० चा सपोर्ट १४ ऑक्टोबर २०२५ मध्ये बंद करण्यात येईल असं लिहिलं आहे.

Windows 11 Dark Mode

काल चीनी वेबसाइट बायडूवर चक्क Windows 11 चा डेव्हलपर प्रीव्यू सुद्धा लीक झाला आहे. त्यावरून विंडोज ११ कसं दिसेल याचा अंदाज येतो. नवं डिझाईन, नवं स्टार्ट बटन, वॉलपेपर, आयकॉन्स, विंडोसाठी गोलाकार कोपरे, रंगसंगतीचे बरेच पर्याय, विंडो मॅनेज करण्यासाठी नवे पर्याय, नवं अॅक्शन सेंटर, इ बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. यामध्ये स्टार्ट मेन्यू जरी मध्यभागी दिसला असला तरी तो नेहमीप्रमाणे डावीकडेसुद्धा ठेवता येतो.

याला विंडोज ११ म्हटलं जात असलं तरी याचं बरच डिझाईन काही दिवसांपूर्वीच मायक्रोसॉफ्टने रद्द केलेल्या Windows 10X ऑपरेटिंग सिस्टमसारखच दिसून येत आहे. त्यामुळे अजूनही कार्यक्रमाच्या दिवशी काही बदल दिसून येऊ शकतात. शिवाय विंडोजच्या हँडलवरून This is just the Start. असं ट्विट करण्यात आल्यामुळे हे लीक करणं जाणीवपूर्वक सुद्धा केलेलं असू शकतं.

यामध्ये तुलनेने नव्या सोयी सध्यातरी कमी दिसत आहेत. नुसत्या डिझाईनसाठी नवं विंडोज जाहीर करण्याची गरज होती का असा प्रश्न आता विचारला जात आहे. मात्र याबद्दल अधिक आता मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत कार्यक्रमावेळीच कळू शकेल. http://msft.it/6015VATZz

Exit mobile version