ॲपलचं iOS 14.5 प्रायव्हसी अपडेट : आता ॲपल Vs फेसबुक वाद !

ॲपलने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या iOS मध्ये नवं अपडेट दिलं असून iOS 14.5 मध्ये App Tracking Transparency (ATT) ही सोय जोडण्यात आली आहे. यामुळे आपल्या फोनमधील ॲप्सना परवानगीशिवाय आपल्या ऑनलाइन ॲक्टिविटी ट्रॅक करता येणार नाही. हे अपडेट केल्यावर तुम्हाला तुमच्या आयफोन व आयपॅडमध्ये नोटिफिकेशन येईल की तुम्हाला या ॲपला ट्रॅक करण्याची परवानगी द्यायची आहे की नाही.

आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल की फेसबुक, इंस्टाग्राम सारखे ॲप्स आपण ते वापरत नसतानासुद्धा आपण कोणत्या वेबसाइट पाहतो, त्या वेबसाइटवर काय सर्च करतो याची माहिती आपल्याला न सांगता गोळा करत राहतात. ही माहिती तिसऱ्या कंपनीला विकून या माहितीच्या आधारे आपल्याला जाहिराती दाखवण्यात येतात. या माहितीत आपलं वय, लोकेशन, आरोग्याची माहिती, खर्च करण्याच्या सवयी, ब्राऊजिंग हिस्ट्री, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, आवडतं संगीत/गाणी, नोकरी, इ. माहितीचा समावेश असतो. या डेटाचा वापर करून यूजर्सची एक आभासी प्रोफाइल तयार केली जाते जी नंतर जाहिरातदारांना विकण्यात येते व पुढे तुमच्या निर्णय क्षमतेवर नियंत्रण मिळवण्यासाठीही वापरण्यात येते. काही वेळा तर अशा माहितीचाच वापर करून निवडणुका किंवा घटनांचं समर्थन किंवा विरोध करणं यावर प्रभाव टाकण्यात आला आहे. यावरून आपल्याला समजावं की हे किती धोकादायक आहे.

ॲपलच्या या नव्या अपडेटमुळे आपल्याला या ॲप्सना ट्रॅक करण्याची परवानगी द्यायची की नाही हे ठरवण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. जर तुम्ही Allow केलं तर वरील माहिती गोळा करणं सुरू राहील पण जर तुम्ही ट्रॅक करू नका असं सांगितलं तर या ॲप्सना ट्रॅक करण्याची परवानगी दिली जाणार नाही. यामुळे ब्रॅंडसना आपल्याला टार्गेटेड ॲड्स दाखवता येणार नाहीत.

जर तुम्हाला नवं अपडेट करूनही पॉप अप आला नसेल तर Settings > Privacy > Tracking मध्ये जावं लागेल आणि तिथे कोणते ॲप्स ट्रॅकिंगची परवानगी मागत आहेत ते दिसेल. अजूनही सर्व ॲप्सनी यासाठी अपडेट दिलेलं नाही.

या निर्णयामुळे फेसबुक मात्र भलतंच नाराज झालं आहे! त्यांच्या बिझनेसवर याचा मोठा परिणाम होणार आहे कारण शक्यतो लोक त्यांच्या ट्रॅकिंगला नकोच म्हणणार हे उघड आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यामुळे आम्हाला युजर्सना खास त्यांच्यासाठी तयार केलेल्या जाहिराती दाखवता येणार नाहीत. याचा परिणाम छोट्या उद्योगांवर होईल. शिवाय ॲप्स मोफत उपलब्ध करून देणं अवघड होईल. ज्यामुळे आम्हाला सभासदत्व देण्यास सुरुवात करावी लागेल आणि युजर्सना या सध्या मोफत असलेल्या सेवांसाठी पैसे द्यावे लागतील असं फेसबुककडून सांगण्यात येत आहे.

हे सांगताना त्यांनी साजूकपणाचा आव आणत आता चक्क ‘हे ॲप मोफत ठेवण्यासाठी आम्हाला ही परवानगी द्या’ असा पॉप अप दाखवण्यास सुरवात केली आहे. फेसबुकने ॲपलला या गोष्टीवरून बराच विरोध केला आहे. काही देशात तर त्यांनी थेट वृत्तपत्रांमध्येही पानभर जाहिराती दिल्या आहेत की ॲपलमुळे छोट्या उद्योगांचं कसं नुकसान होईल! खरतर फेसबुकने आज उभं केलेलं साम्राज्यच मुळात लोकांचा डेटा विकून उभारलेलं आहे. आताही त्यांच्या खात्यात बक्कळ पैसा शिल्लक आहे. त्यामुळे यूजर्सना त्यांची काळजी करण्याची काही एक गरज नाही.

ॲपलने यावर असं स्पष्टीकरण दिलं आहे की आमच्यासाठी आमच्या युजर्सची प्रायव्हसी महत्वाची आहे. म्हणूनच आम्ही हा बदल करत आहोत. शिवाय जर कुणाला ट्रॅकिंगची परवानगी द्यायची असेल तर तसा पर्यायसुद्धा आम्ही दिलेला आहेच. ॲपलच्या किंमती सारख्या गोष्टींबाबत बऱ्याच लोकांचे मतभेद असले तरी प्रायव्हसीबाबत तर सध्या ही एकच कंपनी ग्राहकांच्या बाजूने निर्णय घेत असल्याचं दिसत आहे.

आमचं म्हणणं तर असं आहे की ॲपलसोबत आता इतरही ऑपरेटिंग सिस्टम व फोन्स बनवणाऱ्या कंपन्यांनी ॲप्सना ट्रॅकिंग करू द्यायचं की नाही याचा पर्याय द्यायला हवा. अँड्रॉइडवर तर जाहिरातींचा अक्षरशः भडिमार होत असलेला पाहायला मिळत असून गूगलचं यावर अजिबात नियंत्रण दिसून येत नाही. काहीवेळा तर गूगल कडूनही अयोग्य/अश्लील म्हणता येतील अशा जाहिराती दाखवल्या जात आहेत. अँड्रॉइड तर गूगल स्वतः डेव्हलप करत आहे आणि त्यांचाही उद्योग जाहिरातींवरच अवलंबून आहे त्यामुळे ॲपलइतकं कडक पाऊल ते उचलण्याची शक्यता कमी असली तरी काही प्रमाणात जरी बदल झाला तरी तो सर्व अँड्रॉइड यूजर्ससाठी चांगला निर्णय असेल.

कालच सिग्नल ॲपने इंस्टाग्रामवर जाहिराती करून लोकांचा डेटा कशाप्रकारे वापरला जात आहे हे उघड केलं होतं त्यावर फेसबुकने त्यांचं ॲड अकाऊंटच डिलिट केलंय!

https://youtu.be/Ihw_Al4RNno
Exit mobile version