फेसबुक डेटा लीक : तुमचं अकाऊंट हॅक झालं आहे का ते असं पहा…

मार्क झकरबर्गचाही डेटा लीक : WhatsApp चा मालक वापरतोय सिग्नल ॲप!

काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये फेसबुकच्या आजवरच्या सर्वात मोठ्या डेटा लीकमध्ये तब्बल ५३.३ कोटी युजर्सचा डेटा आता डार्क वेबवर उपलब्ध झाला आहे. यामध्ये भारतातल्या ६० लाख लोकांचा डेटा आहे. या हॅकमध्ये पूर्ण नाव, लोकेशन, जन्मतारीख, ईमेल आयडी, फोन क्रमांक, रिलेशनशिप स्टेट्स अशी संवेदनशील माहिती आता प्रकाशित झाली आहे.

विशेष म्हणजे ह्या लीकमध्ये फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांचाही डेटा सापडला आहे. त्यांचा फोन क्रमांक आणि इतर पर्सनल माहितीही ऑनलाइन आली आहे. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की यामधील माहीतीनुसार फेसबुकचे संस्थापक आणि WhatsApp ची मालकी असलेले हे महाशय स्वतः सिग्नल (Signal) ॲप वापरत आहेत असंही यामध्ये दिसून आलं आहे! ही माहिती सिक्युरिटी रिसर्चर्सनी ट्विटरवर प्रकाशित करून दिली आहे.

आणि हे एवढं मोठं प्रकरण होऊन सुद्धा फेसबुकने अद्याप या लीकमध्ये सापडलेल्या लोकांना notify करून कळवलेलं नाही. केवळ आम्हाला एक त्रुटी सापडली आणि आम्ही ती २०१९ मध्ये दुरुस्त केली आहे असं सांगितलं आहे. मात्र ज्यांची माहिती चोरण्यात आली त्यांचं काय करायचं याचं उत्तर कंपनी अजूनही देऊ शकलेली नाही. दुसऱ्यांना आमचा प्लॅटफॉर्म सुरक्षित आहे, युजर्सची माहिती गोपनीय आहे असं सांगणारा झकरबर्ग स्वतः मात्र सिग्नल वापरतोय!

तुमचं फेसबुक अकाऊंट या लीकमध्ये सापडलं आहे का ते खालील वेबसाइटवर पाहू शकता
लिंक : https://haveibeenpwned.com

या वेबसाइटवर जाऊन तुमचा ईमेल आयडी टाकून पहा. आजवर तुमचा ईमेल कोणकोणत्या वेबसाइटवरून हॅक झाला आहे ते समजेल. जर तुम्ही फेसबुकवर ईमेल आयडी जोडला असेल तरच तुम्हाला या लीकमधील तुमच्या अकाऊंटची माहिती मिळेल. तुम्ही जर केवळ फोन क्रमांक वापरुन अकाऊंट तयार केलं असेल तर ते इथं हॅक झालं आहे की नाही ते सांगू शकणार नाही. या संबंधी माहिती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं या वेबसाइटच्या ट्रॉय हंट यांनी सांगितलं आहे. येत्या काही तासात फोन नंबर टाकूनही माहिती मिळवता येईल.

जर तुमचं अकाऊंट हॅक झालेल्या यादीत असेल तर Oh no — pwned! असा लाल रंगाचा मेसेज दिसेल आणि त्या वेबसाइटचं नाव व तो डेटा कधी हॅक झाला आहे ते समजेल. जर हॅक झालेल्या यादीत सापडला असेल तर तुम्ही त्वरित त्या त्या अकाऊंटचे पासवर्ड बदलून घ्या. जर ते अकाऊंट वापरतच नसाल तर ते डिलिट करून टाका.

महत्वाच्या लिंक्स
https://haveibeenpwned.com
https://twitter.com/haveibeenpwned
https://twitter.com/troyhunt

Exit mobile version